पिफ फोरम’- दिवस तिसरा- चित्रपटांच्या पत्रकार परिषदांमधील प्रमुख मुद्दे

867

प्रतिभा चौधरी, पुणे मल्हार न्यूज नेटवर्क

 चित्रपट- ‘बोधी’– मराठी स्पर्धात्मक विभाग

चित्रपटाचे कथालेखक व कलात्मक निर्माते वैभव घोडेश्वर, अभिनेते निनाद महाजनी, केतकी नारायण, निर्माते अलंकार पंढरपती व शभीर भानपुरावाला पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

चित्रपटाचे कथालेखक व कलात्मक निर्माते वैभव घोडेश्वर – मी विदर्भातून आलो आहे आणि चित्रपटांमधून विदर्भ तितकासा दिसत नाही असे मला वाटते. विदर्भातील शेतक-यांच्या समस्या मी पाहिल्या असून आधी मी माझ्या पीएचडी साठी हा विषय निवडला होता. त्यानंतर हा विषय चित्रपटातून मांडायला हवा असे मला वाटले.

अभिनेते व पटकथालेखक निनाद महाजनी- मी सातारचा असल्यामुळे विदर्भातील प्रश्न मला माहीत नव्हते. या शेतक-यांचे जग समजून घेण्यासाठी मी अमरावतीत जाऊन राहिलो. या चित्रपटाचा नायक विन्या हा त्या क्षणात जगणारा माणूस आहे. आहे त्यात तो समाधानी आहे. चित्रपटचा काही भाग आम्ही गडचिरोलीतील लहान गावात चित्रित केला. चार घरे, पाण्याचा स्त्रोत आणि काही मेंढया एवढेच त्यांचे जग होते. त्या चित्रिकरणादरम्यान जगण्याविषयी एक वेगळा दृष्टीकोन मिळाला.

अभिनेत्री केतकी नारायण- मी अकोल्याची असल्यामुळे चित्रपटाच्या विषयाशी स्वतःला जोडून घेऊ शकले. चित्रपटातील स्वातीची भूमिका करताना मी आधीच तिच्याविषयी कोणतीही मते बनवलेली नव्हती. ती केवळ तिला येणा-या अनुभवांना प्रतिसाद देत आहे हे लक्षात ठेवून भूमिका समजून घेतली.

निर्माते अलंकार पंढरपती- या चित्रपटाचे चित्रिकरण १८ दिवसांत करण्यात आले. प्री प्रॉडक्शनला ६ महिने तर पोस्ट प्रॉडक्शनला २ महिने लागले.

——–

चित्रपट- द रेड फालुस- वर्ल्ड काँपिटिशन विभाग

अभिनेत्री शेरिंग यूडन या वेळी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होत्या.

अभिनेत्री शेरिंग यूडन- अभिनयाचा हा माझा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे चेह-यावरील भावना कशा असायला हव्यात हे मला माहिती नव्हते. परंतु कॅमेरा सुरू झाल्यावर ते होऊन जात असे. या चित्रपटात माझी भूमिका १६ वर्षांच्या मुलीची आहे. आयुष्यात अत्यंत कठीण परिस्थितीतून जाणारी ही मुलगी तिच्यावर वर्चस्व गाजवणा-या तिच्या प्रियकराचा खून करते तो प्रसंग खूपच अवघड होता. असहाय अवस्थेत असलेली ती त्या प्रसंगानंतर काहीही करायला तयार होते.  

———

चित्रपट- राखोश- भारतीय चित्रपट विभाग

दिग्दर्शक व पटकथालेखक श्रीविनय सालियन, अभिनेते सोनमणी जयंत, अतुल महाले व बरुन चंदा, कार्यकारी निर्माते प्रशेन क्यावल, निर्मात्या सायली देशपांडे, पब्लिसिस्ट एस. रामचंद्रन

दिग्दर्शक श्रीविनय सालियन-  

हा चित्रपट प्रसिद्ध लेखक नारायण धारप यांच्या ‘पेशंट ३०२’ या कथेवर आधारित आहे. मी मूळची कथा न वाचता ती ऐकली आणि त्यावरून पटकथा लिहिली. परंतु ती मूळ कथेशी मिळतीजुळतीच आहे.

कार्यकारी निर्माते प्रशेन क्यावल- ही कथा मनोरुग्णालयात घड असल्याने आम्ही ठाण्याच्या मनोरुग्णालयास भेट देऊन तिथले वातावरण समजून घेतले. कारण आम्हाला चित्रपटातील दृष्ये फिल्मी वाटू द्यायची नव्हती.

अभिनेत्री सोनमणी जयंत- कोणतीही भूमिका साकरताना अभिनेत्याला त्याच्या आयुष्यातील अनुभव घेऊन त्यातूनच भूमिका उभी करावी लागते. रेल्वे स्टेशन, बस, झोपडपट्टी अशा विविध ठिकाणी पाहिलेल्या व्यक्तिरेखांना डोळ्यासमोर ठेवून मी ही भूमिका उभी केली.

———–

चित्रपट- चुंबक- मराठी स्पर्धात्मक विभाग

चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप मोदी, अभिनेते साहिल जाधव व संग्राम देसाई पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.  

दिग्दर्शक संदीप मोदी- आम्ही जोपर्यंत आमचे समाधान होत नाही तोपर्यंत ४ वेळा संपूर्ण चित्रपट लिहिला. चित्रपटातील प्रत्येक गोष्ट वास्तववादी असेलच असे नाही परंतु चित्रपट प्रेक्षकांना विश्वासार्ह वाटणे गरजेचे. चित्रपटातील संवाद जेव्हा पात्रांच्या तोंडी ऐकायला मिळतात तेव्हा एक प्रकारे ते पुन्हा लिहिले जात असतात. आमच्या चित्रपटात साहिल जाधव व संग्राम देसाई या तरुण मुलांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये ते एकमेकांचे मित्र वाटणे आवश्यक होते. त्यामुळे चित्रिकरणापूर्वी आम्ही एकत्र राहायला लावले. अभिनेत्यांच्या तोंडी रुळलेले रोजच्या वापरातले काही संवादही आम्ही चित्रपटात वापरले आहेत.

————