येत्या ३ डिसेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार ‘पिरेम’!

655

गेल्या दीडेक वर्षांपासून कोरोना महामारीमुळे निष्प्रभ झालेली चित्रपटसृष्टी पुन्हा उभारी घेऊ पाहतेय. लॉकडाऊन मध्ये आणि नंतरही बंद ठेवण्यात आलेली सिनेमागृहे आता सुरु झाली असून हिंदी सोबत मराठी चित्रपटही प्रदर्शनासाठी तयारी करताहेत. पर्व फिल्म्स निर्मित ‘पिरेम’ हा मराठी सिनेमादेखील येत्या ३ डिसेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

‘पिरेम’ ह्या नावावरून कल्पना आलीच असेल की कथा ग्रामीण भागातील आहे. ही कहाणी एका गावातील गरीब घरातील अत्यंत हुशार मुलाची आहे, जो गावात उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे दहावीनंतर शहरातील कॉलेजात शिकायला जातो. तिथे त्याच्या आयुष्यात प्रेमांकुर फुलतो परंतु तो एका विचित्र प्रसंगात गुरफटून जातो. पर्व फिल्म्स निर्मित ‘पिरेम’ या चित्रपटातून विश्वजीत पाटील आणि दिव्या सुभाष ही एक नवीनतम जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांच्यासोबत मानिनी दुर्गे, विठ्ठल खलसे, सागर खुर्द यांसारखी तगडी कलाकार मंडळी सोबतीला आहेत.

जगात कुठेही गेलात तरी प्रेम ही भावना सारखीच दिसून येईल. जात, भाषा, वर्ण, धर्म, गरीब, श्रीमंत, शहर वा गाव अशा कुठल्याही गोष्टी प्रेमामध्ये अडसर ठरत नाहीत. खऱ्या प्रेमामध्ये स्वार्थाला तसूभरही जागा नसते व दोन्ही व्यक्ती समोरच्याला अधिकाधिक आनंद मिळावा यासाठी प्रयत्शील असतात. प्रदीप लायकर दिग्दर्शित ‘पिरेम’ या मराठी चित्रपटात याच भावनेला अतिशय वेगळ्या ढंगाने पेश केलं आहे.

एक निस्वार्थी ग्रामीण प्रेमकथा असलेला चित्रपट ‘पिरेम’ ३ डिसेंबर २०२१ ला संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.