पुण्यामध्ये जर्मनी आणि रशिया उद्योग, व्यापार सहायता केंद्र सुरु

491

पुणे:- जर्मनी आणि रशिया या दोन देशांमधील व्यापार संबंध वाढवण्यासाठी पुण्यामध्ये नुकतेच उद्योग आणि व्यापार सहायता केंद्र सुरु करण्यात आले. भारतातील आघाडीची आंतरराष्ट्रीय व्यापार आणि थेट परकीय गुंतवणूक सहाय्यक संस्था क्रिसेंडो वर्ल्डवाईडच्या वतीने या केंद्राची स्थापना करण्यात आली. जर्मनीचे महावाणिज्यदूत डॉ. जर्गेन मोर्हार्ड आणि भारतातील रशियन निर्यात केंद्र प्रमुख तैमूर वेकिलोव्ह, यांच्या शुभहस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. क्रेसेंडो वर्ल्डवाईडचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विशाल जाधव आणि उपाध्यक्षा सायली इंगवले यावेळी उपस्थित होत्या. संस्थेच्या सहकारनगरमधील विभागीय कार्यालयात हा करार संपन्न झाला.

तैमूर वेकिलोव्ह आणि सायली इंगवले यांनी भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक व्यापार संबंध वाढवण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे क्रेसेंडो वर्ल्डवाइड हे रशियन निर्यात केंद्रासाठी आता भारताचे भागीदार झाले. या दोन्ही राष्ट्रांमध्ये दशकापूर्वीच्या धोरणात्मक संबंधांवर भर देत गुंतवणूक आणि व्यवसायाचा विकास वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

डॉ. जर्गेन मॉर्हार्ड म्हणाले की, भारत हि अमर्याद संधी आणि अमर्याद क्षमतांची भूमी आहे. क्रेसेंडो वर्ल्डवाइडने भारत आणि जर्मनी देशातील आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने विस्तारासाठी सातत्याने दिलेल्या गतिमान योगदानाचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

तैमूर वेकिलोव्ह म्हणाले की, दोन्ही देशांतील व्यापार वाढीसाठी अभियांत्रिकी, उत्पादन, आयटी, रेल्वे, एरोस्पेस, संरक्षण, अन्न प्रक्रिया, कृषी यंत्रसामग्री, इलेक्ट्रिक वाहने, स्मार्ट शहरे आणि इतर अनेक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि थेट परकीय गुंतवणूकीसह जगाला एकत्र आणण्यासाठी क्रेसेंडो वर्ल्डवाइडचे योगदान मोठे आहे. तसेच पुण्यातील कार्यालयात झालेल्या स्वागताबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

विशाल जाधव म्हणाले की, आंतरराष्ट्रीय व्यापार विस्तारासाठी विविध क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधी वाढवण्यासाठी जर्मनी आणि रशिया डेस्क सेंटर सुरू केल्यानंतर क्रेसेंडो वर्ल्डवाइडने आता विविध क्षेत्रांमधील व्यवसाय विस्तारासाठी मजबूत आणि धोरणात्मक भागीदारीसाठी तसेच सर्वांगीण आणि भविष्यवादी दृष्टिकोनासह जगभरातील विविध देशांना एकत्र आणण्याचे ध्येय ठरवले आहे.

—————————