दिव्यांगाना मार्गदर्शन मिळाल्यास ते स्वावलंबी होतील-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

382

पुणे दि.२९: दिव्यांग व्यक्तीची सेवा हे ईश्वरसेवेपेक्षाही मोठे काम आहे. समाजाने दिव्यांग व्यक्तींना आधार देण्यासाठी पुढे यावे,दिव्यांगाना मार्गदर्शन मिळाल्यास ते स्वावलंबी होतील, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केंद्र वानवाडी येथे आयोजित वार्षिकोत्सव कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार तथा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावत, सचिव लताताई बनकर, कार्याध्यक्ष मुरलीधर कचरे आदी उपस्थित होते .

श्री.कोश्यारी म्हणाले, आपल्या देशात पुर्वीपासूनच दिव्यांग, रुग्ण तसेच गरजवंताना मदत करण्यासाठी समाज पुढे येतो. गरजवंताना मदत करण्याची देशातील परंपरा कायम आहे. यापुढील काळातही अशा दिव्यांग व्यक्तींच्या सेवेसाठी समाजाने पुढे यावे.

देशात दिव्यांग व्यक्तींची मोठी संख्या आहे. दिव्यांगाच्या कल्याणासाठी अनेक सामाजिक संस्था काम करतात. दिव्यांग व्यक्तीही विविध क्षेत्रात यश मिळवत आहेत. दिव्यांगांना मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच पुढे जातील. दिव्यांगाच्या कल्याणासाठी वानवडी येथे संस्थेने केलेले कार्य निश्चितच महत्वपूर्ण आहे, असेही ते म्हणाले.

संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी यावेळी विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात श्री. कचरे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली.

राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते दिव्यांगासाठी कार्यरत संस्थेला दिव्यांग कल्याणकारी सेवा पुरस्कार तसेच गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आले, तसेच दिव्यांग व्यक्तीला आवश्यक साहित्याचेही वाटप करण्यात आले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी संस्थेच्या विविध विभागांची पाहणी केली तसेच संगणक खरेदीसाठी संस्थेला १५ लाख रूपयांची मदत जाहीर केली. यावेळी दिव्यांग विद्यार्थी, पालक तसेच संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

000