तरुणाईच्या जुगाडू वृत्तीवर भाष्य करणार मराठी चित्रपट ‘जुगाड जनता’

283

पुणे:- पुरुषोत्तम फिल्म इन्स्टिटयूटच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे वाईमध्ये चित्रीकरण पूर्ण झाले. पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार असून तरुणाईतील असणाऱ्या जुगाडू प्रवृत्तीवर चित्रपट भाष्य करणार असल्याचे दिग्दर्शक प्रशांत आर पाटील यांनी सांगितले. मराठीमध्ये दादा कोंडके यांच्यानंतर हा पहिलाच ग्रामीण आणि विनोदी बाज असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यावेळी निर्मात्या हेमा तुपे उपस्थित होत्या. पत्रकार परिषदेला उपस्थित शिवसेना नेते सुरेशभाऊ भोर म्हणाले की, माणसाच्या व्यस्त आयुष्यात थोडी तरी मनोरंजनाची आवश्यकता असते. दादा कोंडके यांच्यापासून सुरु झालेली हास्याची मेजवानी कुठेतरी बंद होते की काय असे वाटत असताना जुगाड जनतासारखे विनोदी चित्रपट आपल्या इथे निर्माण होत आहेत ही आनंददायी बाब आहे. पाटील यांच्या पुरुषोत्तम फिल्म इन्स्टिटयूट च्या उदघाटन प्रसंगी त्यांनी उपस्थित मान्यवरांना शब्द दिला होता तो त्यांनी पाळला. लवकरच त्यांच्या इन्स्टिटयूटचा दुसरा चित्रपटही येईल. कलाकार आणि तंत्रज्ञ यांचेही त्यांनी अभिनंदन केले.

जुगाडाशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही. प्रेमासाठी, मैत्रीसाठी, नात्यांसाठी अशा कोणत्यातरी गोष्टीसाठी माणसाला जीवनात जुगाड करावाच लागतो. त्याशिवाय आपलं जगणं शक्य नाही. चित्रपट फक्त जुगडावरचं भाष्य करत नाही तर त्यापुढे जाऊन युवा पिढीत आशा निर्माण करेल. चित्रपटातील गावसुद्धा एक पात्र म्हणून काम करताना दिसेल, असे लेखक कल्पेश जगताप यांनी सांगितले.

चित्रपटाची कथा आणि पटकथा कल्पेश जगताप यांची असून, संवाद ऋषिकेश पवार आणि कल्पेश जगताप यांचे आहेत. चित्रपटाच्या मध्यवर्ती भूमिकेत रोहित चव्हाण आणि लक्ष्मी विभुते दिसणार आहेत. निर्मात्या हेमा तुपे आणि एकनाथ गिते यांची केमेस्ट्रीही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राहुल मगदुम आणि गायत्री बनसोडे यांच्यासह, शिवानी घाडगे, श्रद्धा पवार, नंदा दानवले, महेश जाधव, प्रणव थोरवडे, रोहित भोसले, अक्षय धमाल, ओंकार भोसले, राजू जगताप, अल्पेश चव्हाण, पृथ्वीराज लांडगे, संतोष पाटील हे कलाकारांच्या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत.

चित्रपटात तीन गाणी असून दिग्दर्शक प्रशांत पाटील यांच्या पुरुषोत्तम फिल्म इन्स्टिटयूट निर्मित चित्रपटाचे चित्रीकरण कौशल गोस्वामी यांनी केले आहे. तर प्रकाश योजना धनाजी यमकर यांनी केली आहे.चित्रपटाचे सहदिग्दर्शन अजय वाघमारे, प्रीतम रणबागले, आलोक गायकवाड यांनी केले आहे. यावेळी, श्रीकांत भुरुक, विनोद दानवले, धनाजी यमकर, समीर तुपे, सौरभ भिसे यांच्यासह चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.
——