आळंदी नगरपरिषद प्रभाग आरक्षण जाहीर

330

आळंदी (अर्जुन मेदनकर )  : येथील आळंदी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनादेशा प्रमाणे प्रभाग क्रमांक १ ते १० यातील उमेदवारांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडतीतून काढत जाहीर करण्यात आले.
यासाठी आळंदी नगरपरिषद कार्यालयात अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुढील निवडणूक प्रक्रियेतील प्रभागाचे उमेद्वारांसाठीचे आरक्षण काढून उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांचे नियंत्रणात आरक्षणे जाहीर करण्यात आली. या प्रसंगी खेडच्या तहसीलदार वैशाली वाघमारे, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे, माजी नगरसेवक अशोक उमार्गेकर,सचिन गिलबिले,शिवसेनेचे शहर प्रमुख अविनाश तापकीर, अर्जुन काळे आदींसह अधिकारी, पदाधिकारी,कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते.
आरक्षण सोडतीत प्रथम अनुसूचित जाती महिला व अनुसूचित पुरुष या संवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी येथील सहावीतील विद्यार्थी यशोवर्धन घुंडरे यास सोडतीत प्रभाग क्र. २अ आणि प्रभाग क्र. १० अ यासाठी चिट्ठी निवड करीत आरक्षण काढले. यात प्रभाग क्रमांक १० अ आणि २ अ अनुसूचित जाती आरक्षण महिला जागेसाठी चिठ्ठी द्वारे काढण्यात आले. उपजिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचे माध्यमातून चिठ्ठी सर्वाना दाखवीत आरक्षण जाहीर केले. यात प्रभाग क्रमांक १० अ जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव तसेच दुसरी जागा अनुसूचित जाती प्रभाग क्र.२ अ अनुसूचित जाती आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. लोकसंख्या, जाती निहाय लोकसंख्या आणि प्रभाग संख्या त्यांचे प्रमाणात महिलांसाठी राखीव जागांचे प्रभाग निश्चित करून नंतर उर्वरित प्रभाग सर्वसाधारण जाहीर करण्यात आले. यासाठी शासन आदेशांचा दाखला देत प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्र. १ अ) सर्वसाधरण महिला ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र.२ अ) अनुसूचित जाती ब) सर्व साधारण महिला, प्रभाग क्र.३ अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र.४ अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र.५ अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र.६ अ) सर्व साधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र.७ अ)सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र.८ अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र.९ अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र.१०, अ) अनुसूचित जाती महिला, ब) सर्वसाधारण महिला, क) सर्वसाधारण या प्रमाणे प्रभाग आरक्षण सोडत काढून जाहीर करण्यात आल्या.
आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत प्रसंगी तहसीलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अंकुश जाधव, कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे यांनी कामकाज पाहीले. आळंदी नगरपरिषद सभागृहात २१ सदस्य संख्या राहणार आहे. यात प्रभाग १ ते ९ दोन सदस्यीय असून प्रभाग क्रमांक १० तीन सदस्यीय प्रभाग असून यासाठी संवर्ग निहाय प्रभाग आरक्षणे जाहीर करण्यात आली. मध्ये अ ब एकूण १८ सदस्य तर १० मध्ये अ ब क ३ सदस्य आहेत. महिलांचे आरक्षण धोरणानुसार आळंदी नगरपरिषद सभागृहात महिला सदस्यांची संख्या ११ तर पुरुष सदस्यांची संख्या १० राहणार आहे. यासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.