मातीच्या संरक्षणामुळे जीवन फुलांसारखे सुगंधित होईल सद्गुरू जग्गी वासुदेव

334

जगातील सर्वात मोठ्या विश्व शांती घुमटाला भेट व विद्यार्थ्यांशी साधला संवाद

पुणे,दि.१५ जून : “ माणसाने आपले सौंदर्य जपले पाहिजे, त्यात कधीही कमीपणा येऊ देऊ नका, असे झाले तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत आनंदी व्हाल. या जीव सृष्टीला फुलांंसारखे सुगंधित करायचे असेल, तर माती संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा घ्यावी.” असे विचार अध्यात्मिक गुरू, ईशा फाउंडेशनचे संस्थापक पद्मविभूषण सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी केले.
२६ देशांचा दौरा करून आलेल्या सद्गुरूंनी माती संवर्धनाचा जागर करण्यासाठी राजबाग लोणी काळभोर येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमट म्हणजेच तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर-जगदगुरू तुकाराम महाराज विश्व शांती प्रार्थना सभागृह व ग्रंथालयाला भेट दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरण रक्षण व माती संवर्धनाचे आवाहन केले. येथे सर्वांनी माती संवर्धनाची शपथ घेतली. हा कार्यक्रम एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने आयोजित केला होता.
या वेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस आणि प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते. तसेच येथे हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सद्गुरू जग्गी वासुदेव म्हणाले,“ जागतिक तापमानात होणारी वाढ लक्षात घेऊन पर्यावरण संरक्षण आवश्यक आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची पोत शक्ती हळूहळू कमी होत आहे. प्राणी आणि वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी व जमिनीची सुपिकता राखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पृथ्वीवरील परिसंस्थेमध्ये जैवविविधता अत्यंत महत्वाची आहे. जमिनीची सुपिकता कमी झाल्यामुळे पृथ्वीवर अन्नाचे उत्पादन कमी होईल. त्यामुळे अन्नाची समस्या वाढणार आहे. जमिनीत पुरेशा सेंद्रिय पदार्थांच्या उपस्थितीसाठी आपण सर्वांनी पुढे यावे. सर्व सजीवांसाठी माती अत्यंत महत्वाची आहे. माती वाचवण्याचे काम आताच सुरू केले नाही, तर येत्या काही वर्षात जगावर अन्नांचे संकट ओढवेल.”
“ मानवी शरीरात ६० टक्के जीवजंतू आहेत. जीवजंतूंचे अस्तित्व धोक्यात आल्यास मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. भारतातील ३० टक्के सुपीक माती आधीच नापीक झाली आहे आणि ती उत्पन्न देण्यास असमर्थ आहे. भारताच्या ६३ टक्के भूभागात, जमिनीत ०.५ टक्क्यांहून कमी सेंद्रिय पदार्थ शिल्लक आहेत. गेल्या दशकांमध्ये, जमिनीतील सेंद्रिय सामग्री झपाट्योन कमी झाली आहे. झपाट्याने खराब होणारी माती आपल्या अस्तित्वाला मोठा धोका आहे. अनियमितपणे वृक्षतोडीमुळे हिरवे आच्छादन नष्ट झाले आहे. ”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले, “ पद्मविभूषण सद्गुरू जग्गी वासुदेव हे भारतीय आत्मा आहेत. संपूर्ण जगाला माती वाचविण्याचा सार्वत्रिक संदेश देऊन सद्गुरूंनी एक नवी क्रांती घडवून आणली आहे. या चळवळीला संस्थेचे विद्यार्थी आणि कर्मचार्‍यांचा पाठिंबा आहे. भारत माता हे ज्ञानाचे दालन व विश्वगुरू म्हणून उदयास येईल. घुमटाच्या माध्यमातून मानवता आणि विश्व कल्याणाचा संदेश जगाला दिला जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जागतिक स्तरावर भगवद्गीता भेट म्हणून देऊन देशाचे नाव संपूर्ण जगात उंचावले आहे. ”
यावेळी सद्गुरू जग्गी वासुदेव यांना पुणेरी पगडी घालून स्वागत करण्यात आले. माती वाचवा या थीमवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केेले. मातीची पोत हळूहळू कमी होत आहे, यावर प्रेरणा चांडक या विद्यार्थीने आपले विचार मांडले.
डॉ.मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मंगेश तु. कराड यांनी आभार मानले.