स्वतः अनुभवलेली …. एका वारकर्‍या ची श्रीमंती ……..

408

माझी प्रशासकीय बदली आळंदी येथे झाली होती .आषाढी वारी अवघ्या 2 दिवसांनी येऊन ठेपली होती .वारकरी आळंदी च्या दिशेने येत होते .वारकरी माऊली माऊली ,विठ्ठल विठ्ठल असा नामघोष करत चालले होते .

मी व माझ्या मैत्रिणी भूक लागली म्हणून हॉस्पिटल च्या आसपास टपरीवर नाष्टा चहा चांगला मिळेल.म्हणून गेलो

10.30 च्या सुमारास नाष्ट्याला काय विचारपूस केली. कांदे पोहे, उसळ पाव आणि चहा काॅफी अशी ऑर्डर दिली. 20 – 25 मिनिटे लागणार होती. ऊन खात उभे होतो.

तेव्हढ्यात एक 80- 85 वयाचं वारकरी जोडपं चालत चालत आमच्याच टपरी पर्यंत आलं. अंगावरचा एकही कपडा धड नाही. आजींच्या डोक्यावर तुळस आणि खाकेत एक बोचकं. बाबांच्या डोकीवर एक बोचकं नी खांद्यावर एक भली मोठी पिशवी. पायताणं यथा तथाच .बरीच दमलेली वाटत होती. टपरीच्याच बाजूला सारं सामान उतरवून ठेवत वाईच जमिनीवरच बसले.

मी आपलं सहज कौतुकाने विचारपूस केली.मी विचारलं नाष्टा करणार का ? बाबांनी एकदा आजीकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली. मी सहज सुचवलं बाबांनो पोटभर खाऊन घ्या. मला उगीचच वाटलं चला तेव्हढच पूण्य . मी बाबांना विचारलं वाटेत चालता चालता काय करता. ते म्हणाले कधी अभंग तर कधी पाडुरंगाचं नाव घेत जातो. म्हनजे अंतर कसं पार झालं उमगत नाय.

मी आपली विनंती केली की एखादा अभंग ऐकवाल का ? बाबांनी क्षणाचा विलंब न लावता अभंगाला सुरुवात केली आणि आजीनी टाळावर साथ दिली. खरंच वेळ कसा गेला समजलंच नाही.

नाष्ट्यावर ताव मारला. त्या वारकरी जोडप्याला आग्रहानी आमच्या बरोबर बसवलं. सहज चौकशी केली की अजून यांना घरी पोहचायला किती दिवस .लागतील ? तर कळले की अजून खुप दिवस.

निरोप घेण्याची वेळ आली. आम्ही त्यांचे आणि त्यांनी आमचे आभार मानायचे सोपस्कार पार पडल्यावर निघालो.

सहज मनात आले की यांना घरी पोचायला अजून खूप दिवस आहेत त्यांना काहीतरी मदत करूया. वारकरी बाबा आणि अजिना थांबवलं आणि 100 रूपयांची नोट त्यांना मदत म्हणून पुढे केली. बाबांनी अदबीने मदत नाकारली. मला आश्चर्य वाटले. मला न राहवून मी विचारले का ?

बाबांनी उत्तर दिलं –

वारीला निघताना घरून एक छदाम घेतला नाही. आत्ता या क्षणालाबी खिशात छदाम नाही. पूर्ण वारी तो पांडुरंगच आम्हा जिवांची काळजी घेतो की. त्यापुढे ताई तुमची ही 100 रूपयांची नोट आमच्या काय हो कामाची.

मी अवाक झाले . क्षणभर काय react व्हावं मला सुधरंत नव्हतं. केवळ सुन्न. क्षणात मला माझी लायकी समजली, डोळ्यातून खळ्ळं आसू आले आणि मी त्या माउलीच्या पायावर डोकं ठेवलं.

2 वर्षांनंतर………

आज जवळपास 2 वर्षांनी ही घटना आठवली आणिक सारा क्रम आणि संवादातील शब्द नी शब्द परत ताजे तवाने होउनी डोळ्यासमोर फिरू लागले.

त्या वारकरी बाबा आणि आजी वय काय होतं. आज माझ्याकडे सगळं आहे. घर, गाडी, उर्वरित आयुष्य बर्‍या पैकी सुखांत पार पडेल एव्हडी व्यवस्था. तरीही मला उद्याची निश्चिंती नक्कीच नाही. पण मग त्या वारकरी बाबांना अंगावर धड कपडे नाहीत, धड अंथरूण पांघरूण बरोबर नाही. वेळ पडली तरी खिशात छदाम नाही. असं असून सुद्धा एक emergency साठी म्हणून मी पुढे केलेले 100 रुपये सुद्धा हा भला माणूस अव्हेरतो आणि प्रंचंड आत्मविश्वासानी सांगतो माझ्या पुढच्या प्रत्येक क्षणाची काळजी तो पांडुरंगच करेल. त्याला आयुष्यात कसलीही पुंजी करून ठेवावं असं नाहीं वाटलं कारणं त्याने जमवली होती पांडुरंगाच्या श्रद्धेची पुंजी होती. त्यामुळे त्याला ना उद्याची भ्रांत ना आयुष्याची चिंता.

ती त्याची श्रीमंती पाहीली आणि नजर स्वतः कडे वळली. त्यानी शाश्वत श्रद्धेची नी भक्तीची पुंजी जमवली आणि मी अशाश्वत पुंजी जमवण्यात धन्यता मानत राहिले

हे परमेश्वरा अजूनही वेळ गेलेली नाही. त्या वारकर्‍याची श्रद्धा आणि भक्ती मला सुद्धा जमवता यावी अशी बुद्धी मला दे, हीच कळकळीची प्रार्थना तुझ्या चरणी.🙏🌺 कविता राजु भालचिम सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन🙏