उदय सामंत हल्ला प्रकरणी सहा जणांना अटक; पाहा नावे…

369

पुणे: शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रज चौकामध्ये हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्या प्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांना अटक केली आहे. राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार यांनाही अटक केली असून, एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, उदय सामंत हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. उदय सामंत हे मोहमद वाडी येथील कार्यक्रम संपवून शिवसेना नेते तानाजी सावंत यांचे कात्रज येथील घराजवळ आले होते. त्यावेळी चौकाजवळ आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले होते. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे उदय सामंत यांचा ताफा होता. कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांना गाडीत बघितले त्यानंतर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. पण, पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. उदय सामंत यांना केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या तीन गाड्या होत्या. तसेच स्थानिक पोलिसांच्या पायलट व्हॅनही सामंत यांच्या ताफ्यात होत्या.