सावित्रीच्या लेकींनी सुरु केले गणेश मंडळ..

229

पुणे, प्रतिनिधी : गुलटेकडी परिसरातील डायस प्लॉट भागातील महिलांनी मिळून ‘सावित्रीच्या लेकी’ हे महिला मंडळ स्थापन केले आहे. झोपडपट्टी भागातील महिलांनी मिळून या गणेश उत्सवाची सुरुवात केली. यामध्ये गणपती बाप्पाला आणण्यापासून त्याची पूजा आर्चा आणि प्रतिष्ठापना करण्यापर्यंत सर्व महिलांनी उत्साहात केले.

या मंडळामध्ये भाग्यश्री  साळुंके, सुनिता नेमूर, शोभना पनिकर, संगीता होळकर, रेखा कदम, अनंतलक्ष्मी कैलासन, मनीषा निंबाळकर इत्यादी महिला कार्यरत आहेत.

भाग्यश्री  साळुंके म्हणाल्या की, महिला ही सक्षम झाली पाहिजे या उद्देशाने आम्ही सावित्रीच्या लेकी महिला मंडळ स्थापन केले आहे. झोपडपट्टी भागातील महिला बऱ्याच वेळा दुर्लक्षित राहतात, त्यांचा घराबाहेरच्या व्यावहारिक जगाचा फारसा संबंध येत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी असतो, खूप गोष्टींची भीती वाटत असते. तसेच त्यांना  स्वतःचे अस्तित्व आहे याची जाणीव नसते. त्यांना सक्षम करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा आम्ही हा प्रयत्न केला आहे. त्यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम चालू करणार आहोत. वेगवेगळे गृह उद्योग पण सुरू करणार आहोत. चार पैसे मिळाले तर त्यांचा स्वतःवरचा विश्वास वाढेल, आणि त्या स्वतः सक्षम होण्यास मदत होईल. प्रत्येकाच्या अंगात एक चांगला गुण असतो. फक्त तो समजणे, आणि त्याच्यावर काम करणे, आवश्यक असते.