पंकज त्रिपाठी यांनी इफ्फीतील ‘मास्टरक्लास’मध्ये अभिनयातील प्रवास आणि आव्हानांबाबत केली दिलखुलास बातचित

312

संकेत हरिभक्त , गोवा

एक कसदार अभिनेता अशी पंकज त्रिपाठी यांची ओळख आहे. मागील दोन दशकांपासून चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारत हिंदी सिनेसृष्टीतील आपलं स्थान पक्कं करणारे पंकज त्रिपाठी सध्या गोव्यात सुरू असलेल्या ५३व्या इंटरनॅशनल फ़िल्म फ़ेस्टिव्हल ऑफ़ इंडियामध्ये (इफ्फी)सहभागी झाले आहेत. त्यांनी आपल्या अभिनय प्रवासाविषयीच्या काही अशा गोष्टी उघड केल्या, ज्यामुळे त्यांच्या सिनेमॅटिक व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी बाजू समोर आली.
इफ्फीमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या ‘मास्टरक्लास’मध्ये पंकज त्रिपाठी सहभागी झाले. एखाद दिवशी त्यांनाही चित्रपटासाठी निवडलं जाईल आणि चित्रपटांमधील त्यांचा अभिनय प्रवास सुरू होईल याची पुसटशीही कल्पना नव्हती असं पंकज त्रिपाठी यांनी तिथे सांगितलं.
पंकज त्रिपाठी म्हणाले की, “मी नॅशनल स्कूल ऑफ़ ड्रामाचा विद्यार्थी होतो आणि तिथे विविध प्रकारच्या नाटकांमध्ये अभिनय करायचो. काही कारणामुळे एक दिवस एक अभिनेता शूटिंगसाठी पोहोचू शकला नाही. त्यावेळी तात्काळ मला त्याच्या जागी रिप्लेस करायला सांगितलं गेलं. अशा काहीशा प्रकारे चित्रपटांमधील माझ्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला होता.”
मुळात बिहारच्या गोपालगंज येथील एका अत्यंत साध्या कुटुंबात जन्मलेल्या पंकज त्रिपाठी यांना मुंबईत आल्यानंतर चित्रपटात काम मिळण्यासाठी स्ट्रगल करावा लागला नाही असं मुळीच नाही. याबाबत पंकज त्रिपाठी म्हणाले की, “सुरुवातीला चित्रपटांमध्ये लहान-सहान भूमिका साकारल्यानंतर पुढील सात-आठ वर्षांपर्यंत कामाच्याबाबतीत फार मोठा गॅप पडला. त्या दरम्यान मला विशेष कामं मिळाली नाहीत. त्या काळात मी बरीच पुस्तकं वाचली आणि आपली अभिनयशैली आणखी धारदार बनवण्याचा कसोशीनं प्रयत्न केला.”
चित्रपटांपासून ओटीटीपर्यंत काम करण्याच्या व्यग्रतेचा उल्लेख होताच पंकज त्रिपाठी हसत-हसत म्हणाले की, आजच्या तारखेला ते इतके बिझी आहेत की काम करताना खूप थकतात. कधी कधी त्यांना कंटाळाही येतो आणि नेहमीच त्यांची झोपसुद्धा पूर्ण होत नाही. खरं तर त्यांना आपली झोप खूप प्रिय आहे.
आजवरच्या सर्वात आव्हानात्मक व्यक्तिरेखेबाबत विचारल्यावर पंकज त्रिपाठी म्हणाले की, “तसं पाहिलं तर अॅक्टिंगची प्रक्रियाच मूळात खूप आव्हानात्मक आहे, पण माझ्यासाठी ‘गुडगांव’ चित्रपटातील व्यक्तिरेखा साकारणं खूपच आव्हानात्मक ठरलं होतं. कारण ती व्यक्तिरेखा अंतर्गत पातळीवर व्यवहार करणारी होती. ते कॅरेक्टर साकारणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. त्या व्यक्तिरेखेला जाणवणाऱ्या वेदना आणि संघर्षानं मला अनेक दिवस सतावलं होतं.”
पंकज त्रिपाठी छोट्या-मोठ्या सर्व प्रकारच्या व्यक्तिरेखांमध्ये जीव ओतण्यासाठी ओळखले जातात. मग भले चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारणं असो, किंवा ओटीटीवरील विविध वेब शोमध्ये अभिनय असो, पंकज त्रिपाठी त्यांच्या कामासाठी नेहमीच कौतुकास पात्र ठरतात. पडद्यावर साकारलेल्या व्यक्तिरेखांपैकी त्यांची सर्वात आवडती व्यक्तिरेखा कोणती असं विचारल्यावर ते म्हणाले की, “‘मसान’ चित्रपटात माझी व्यक्तिरेखा जरी खूप लहान असली तरी ती मला खूप आवडते. या चित्रपटामुळे मला वाराणसीमध्ये शूट करण्याची संधी मिळाली. सहा वर्षांनी मी जेव्हा पुन्हा बनारसला गेलो, तेव्हा जिथे आम्ही शूट केलं होतं त्या बेंचवर एकदा जाऊन बसलो. याखेरीज ‘नील बटे सन्नाटा’ चित्रपटात साकारलेली गणिताच्या शिक्षकाची भूमिकाही माझी खूप आवडती आहे. ‘क्रिमिनल जस्टीस’ या वेब सिरीजमध्ये साकारलेलं माधव मिश्रा हे कॅरेक्टर वास्तवात माझ्या व्यक्तिमत्त्वाशी खूप मिळतंजुळतं आहे. शोमध्ये मी काळा कोट परिधान केला आहे इतकाच काय तो फरक आहे.”