ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

284

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : पुणे आळंदी या पालखी मार्गावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्रीगुरू निवृत्तींनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यात्रा व श्री संत ज्ञानेश्वर माऊली व श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ति प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिना निमित्त अखंड हरिनाम सोहळ्याचे १८ ते २७ जानेवारी २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर देवस्थांन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर , खजिनदार दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
सोहळ्याचे काळात महापूजा व काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, श्री गाथा भजन, महिला भजनी मंडळाची भजने ,हरिपाठ, हरिकीर्तन व हरी जागर असे कार्यक्रम होणार आहेत. या शिवाय मान्यवर कीर्तनकार यांची कीर्तन सेवा संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहेत. यामध्ये सदानंद महाराज लखणे, संतोष महाराज काळोखे, संजय महाराज कावळे, सतीश महाराज काळजे, चंद्रकांत महाराज वांजळे, बाळासाहेब महाराज वाडेकर, संतोष महाराज पायगुडे, महंत ईश्वर महाराज च-हाटे, शंकर महाराज शेवाळे, लक्ष्मण महाराज पाटील यांच्या काल्याचे कीर्तन सेवेने कीर्तन सेवेच्या सोहळ्याची सांगता होणार आहे. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी दिली. सप्ताहात सहभागी होवून लाभ घ्यावा असे आवाहन ॲड.तापकीर यांनी केले आहे.