पराक्रम दिवसानिमित्त 500 केंद्रीय विद्यालयांमध्ये देशव्यापी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

167

नवी दिल्‍ली, प्रतिनिधि,

 

प्रमुख ठळक मुद्दे:

  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, 23 जानेवारी 2023 हा दिवस देशभरात ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे, विद्यार्थ्यांना या महान नेत्याच्या जीवनकार्यातून प्रेरणा मिळावी आणि त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी, या हेतूने हा दिवस पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो.
  • पंतप्रधानांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित ‘एक्झॅम वॉरीयर’ बनणे ही या स्पर्धेची संकल्पना आहे.
  • या स्पर्धेत एकूण 50,000 विद्यार्थी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

परीक्षा पे चर्चा 2023 च्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांमध्ये असलेला परीक्षेचा तणाव दूर करण्यासाठी एक अनोखा उपक्रम म्हणून, 23 जानेवारी, 2023 रोजी देशभरातील 500 विविध केंद्रीय विद्यालयांमध्ये (KV) देशव्यापी चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते आणि हा दिवस ‘पराक्रम दिवस’ म्हणून पाळला जातो. विद्यार्थ्यांनी या महान नेत्याच्या जीवन कार्यातून प्रेरणा घ्यावी आणि त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी ही या मागची भावना आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण मंत्रालयातर्फे देशभरातील शाळांमध्ये उद्या चित्रकला स्पर्धेसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

चित्रकला स्पर्धेत विविध सीबीएससी (CBSE) शाळांचे विद्यार्थी, राज्य शिक्षण मंडळे, नवोदय विद्यालये आणि केंद्रीय विद्यालये यामधील विद्यार्थ्यांचा या अनोख्या सर्जनशील अभिव्यक्तीमध्ये वैविध्यपूर्ण सहभाग अपेक्षित आहे. पंतप्रधानांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित ‘परीक्षा योद्धा’ बनणे ही या स्पर्धेची संकल्पना आहे.

या चित्रकला स्पर्धेत देशभरातून एकूण 50 हजार विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता आहे. मध्यवर्ती केंद्रीय विद्यालये, जिथे हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, तिथे या स्पर्धेत विविध शाळांमधील 100 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याचबरोबर जिल्ह्यातील राज्य मंडळाच्या जवळच्या शाळामधून आणि सीबीएसई (CBSE) शाळांमधून 70 विद्यार्थ्यांना प्रामुख्याने आमंत्रित केले आहे,10 सहभागी विद्यार्थी हे नवोदय विद्यालयातील असतील आणि 20 विद्यार्थी, हे मध्यवर्ती केंद्रीय विद्यालयातून तसेच जिल्ह्यातल्या इतर जवळच्या केंद्रीय विद्यालयातील असतील.

या स्पर्धेतल्या पाच सर्वोत्कृष्ट स्पर्धकांना, स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर आधारित आणि राष्ट्र हिताच्या विषयावरील पुस्तकांचा संच आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये या चित्रकला स्पर्धेविषयी मोठी उत्साह  दिसतो आहे.