*लष्कराच्या जेसीओ/ओआर च्या नवीन भर्ती प्रक्रियेमध्ये सीईई ठरणार पहिली निवड चाचणी

184

भारतीय लष्कराने जेसीओ/ओआर च्या भर्ती प्रक्रियेत बदल जाहीर केले आहेत. पहिल्या टप्प्यात, joinindianarmy.nic.in (JIA वेबसाइट) वर ऑनलाइन नोंदणी केलेल्या आणि अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना सामाईक प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. टप्पा II मध्ये, निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित एआरओ ने ठरवलेल्या ठिकाणी भरती मेळाव्यासाठी बोलावले जाईल, जेथे त्यांची शारीरिक सक्षमता चाचणी आणि शारीरिक मोजमाप चाचणी घेतली जाईल. शेवटी, टप्पा III मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची रॅलीच्या ठिकाणी वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.

*ऑनलाईन नोंदणी*

जेआयए (JIA) वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी 16 फेब्रुवारी 23 ते 15 मार्च 23 पर्यंत सुरू आहे. नोंदणीची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राहील. उमेदवार आपले आधार कार्ड, अथवा दहावीचे प्रमाणपत्र वापरून नोंदणी करू शकतात. सतत ऑटोमेशनचा एक भाग म्हणून, अधिक पारदर्शकतेसाठी जॉईन इंडियन आर्मी (Join Indian Army) वेबसाईट आता डीजीलॉकर बरोबर जोडण्यात आली आहे.
ऑनलाइन सीईई संपूर्ण भारतात 176 ठिकाणी आयोजित केले जात आहे. उमेदवारांना पाच परीक्षा केंद्रे निवडण्याचे पर्याय आहेत आणि त्यांना त्यांच्या पर्यायापैकी एक परीक्षा केंद्र दिले जाईल. ऑनलाइन सीईई साठी प्रति उमेदवार 500/- रुपये शुल्क आहे. शुल्काचा 50 टक्के वाटा लष्कराकडून उचलला जाईल. नोंदणी प्रक्रियेच्या शेवटी उमेदवारांना पेमेंट पोर्टलवर निर्देशित केले जाईल. उमेद्वारांनी इंटरनेट बँकिंग, UPI/BHIM किंवा Maestro, Maestro Card, VISA किंवा RuPay कार्डांसह सर्व प्रमुख बँकांचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून संबंधित बँक शुल्कासह रु. 250/- भरणे आवश्यक आहे. ऑनलाइन व्यवहारांसाठी उमेदवारांना त्यांचे डेबिट कार्ड सक्रिय करण्याचा
सल्ला देण्यात आला आहे. उमेदवाराचे पेमेंट यशस्वी झाल्यानंतरच नोंदणीकृत मानले जाईल आणि या टप्प्यावर रोल नंबर तयार केला जाईल, जो परीक्षेच्या सर्व टप्प्यांवर वापरला जाईल.

जॉईन इंडियन आर्मी वेबसाइट आणि यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमध्ये “अर्ज कसा करायचा” यावरील संपूर्ण प्रक्रिया दिली आहे.

*ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई)*

ऑनलाइन सीईई चाचणीला बसण्यासाठीची, प्रवेशपत्रे परीक्षा सुरू होण्याच्या 10-14 दिवस आधी जॉईन इंडियन आर्मी वेबसाइटवर उपलब्ध असतील. परीक्षेची सूचना उमेदवारांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे आणि त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवली जाईल. प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राचा अचूक पत्ता असेल.

ऑनलाइन सीईई ही संगणकावर आधारित परीक्षा आहे. परीक्षेला बसण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी, ‘ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षेला कसे बसावे’ या विषयावरील व्हिडिओ जॉईन इंडियन आर्मी वेबसाइट आणि यूट्यूबवर देखील उपलब्ध आहे. परीक्षेच्या अभ्यासक्रमात आणि पद्धतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑनलाइन सीईई ची तयारी करण्यामध्ये उमेदवारांना मदत करण्यासाठी, सर्व विषयांच्या सराव चाचण्या विकसित करण्यात आल्या आहेत आणि जॉईन इंडियन आर्मी वेबसाइटवर एक लिंक देण्यात आली आहे. अशा प्रकारे उमेदवार घरबसल्या या परीक्षेचा सराव करू शकतील. सराव चाचणीमध्ये प्रवेश केल्यावर, उमेदवारांना संगणकावर तीच स्क्रीन पाहता येईल जी त्यांना प्रत्यक्ष परीक्षे दरम्यान दिसेल. या सराव चाचण्या मोबाईलवर देखील देता येतील.

 

*भर्ती रॅली*

ऑनलाइन सीईई मधील कामगिरीच्या आधारावर, निवड झालेल्या उमेदवारांना भर्ती रॅलीसाठी नामनिर्देशित ठिकाणी बोलावले जाईल. भर्ती मेळाव्याची पद्धत कायम आहे. अंतिम गुणवत्ता ऑनलाइन सीईई निकाल आणि शारीरिक चाचणीच्या गुणांवर आधारित असेल.

*मदत कक्ष*

उमेदवारांच्या कोणत्याही शंकांचे स्पष्टीकरण देण्यासाठी, एक हे मदत कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे, ज्याचा तपशील जॉईन इंडियन आर्मी वेबसाइटवर उपलब्ध आहे. ऑनलाइन सीईई संबंधित प्रश्नांसाठी, मोबाईल क्रमांक 7996157222 वर देखील स्पष्टीकरण उपलब्ध आहे.

*फायदे*

बदललेली कार्यपद्धती भरती दरम्यान अधिक बौद्धिक पैलूंवर लक्ष केंद्रित करेल आणि परिणामी देशभरात व्यापक स्तरावर पोहोचेल. यामुळे भरती रॅलींमध्ये जमणारी मोठी गर्दी कमी होईल आणि तेथे जास्त प्रशासकीय व्यवस्था लागणार नाही. ही प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित, उमेदवारांसाठी सोपी होईल आणि देशाच्या सध्याच्या तांत्रिक प्रगतीशी सुसंगत असेल.

*पेपर फुटीला आळा*

उमेदवारांच्या लक्षात येईल की, ही प्रक्रिया कमीत कमी मानवी हस्तक्षेपाद्वारे पूर्णपणे स्वयंचलित करण्यात आली आहे. उमेदवारांनी पेपर फुटी करणाऱ्यांना बळी पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे, कारण ते त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करू शकत नाहीत. भर्ती प्रक्रिया पूर्णपणे निःपक्षपाती, निष्पक्ष आणि गुणवत्तेवर आधारित आहे.

*****