सातारचा रियल सलमान

269

योगेश बारस्कर, पुणे (प्रतिनिधी)

आजच्या झगमगटाच्या दुनियेमध्ये तरुणांचे चित्रपटसृष्टी बद्दलचे आकर्षण वाढत आहे. या आकर्षणाला जर योग्य दिशा मिळाली नाही तर तरुण कशाप्रकारे भरकटू शकतात आणि त्याचा त्यांच्या वैयक्तिक जीवनावर कसा गंभीर परिणाम होऊ शकतो हे अतिशय मनोरंजक पद्धतीने सातारचा सलमान या चित्रपटांमध्ये दाखविण्यात आले आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित हा चित्रपट अगदी सुरुवातीपासून हे शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. हा चित्रपट केवळ प्रेक्षकांचे मनोरंजनच करत नाही तर एक प्रकारे तरुणांना सकारात्मक दिशा देण्याचे कामही करतो, त्यामुळे सातारचा सलमान हा केवळ पडद्यावरील सलमान न राहता रियल लाईफ मध्ये ही तरुणांना एक प्रकारे सकारात्मक विचार देऊन जातो त्यामुळे तरुणांनी निश्चितच हा चित्रपट पाहायला हवा.
सातारा जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावांमध्ये राहणाऱ्या आणि बॉलीवूडमध्ये मोठा हिरो होण्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणाची गोष्ट म्हणजे सातारचा सलमान. सुयोग गोरे यात नवोदित कलाकाराने यामध्ये मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. सुयोगच्या वडिलांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे यांनी साकारली आहे. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन बच्चन होण्यासाठी मुंबईमध्ये गेल्यानंतर निराश होऊन ते पुन्हा सातारला परततात. परंतु आपण चित्रपटसृष्टीमध्ये काम करू शकलो नसलो तरी आपला मुलगा एक दिवस खूप मोठा हिरो होईल हे स्वप्न उराशी बाळगून ते मुलाचे पालन पोषण करतात, परंतु मुलगा मात्र स्वप्नांचा प्रवास सुरू होण्याच्या अगोदरच अवसान गाळून बसतो. यानंतर तो मुलगा स्वप्न पूर्ण करतो की नाही आणि त्या मार्गांमध्ये त्याला कशा प्रकारचे अडचणी येतात हे या चित्रपटातून अतिशय मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडले आहे.
सुयोग गोरे या कलाकाराने तरुणांच्या डोळ्यातील स्वप्न त्यांना चुकीच्या मार्गाला गेल्यानंतर झालेला पश्चाताप हा सुयोगणे आपल्या प्रभावी अभिनयाने अतिशय सुंदरपणे रेखाटला आहे. चित्रपटातील गाणी ही अतिशय बॉलिवूड दर्जाची झाली आहे याला प्रसाद भिडे यांच्या कॅमेराने चित्रपट अतिशय सुंदर रेखाटला आहे. सातारा मधील सर्वसामान्य प्रेक्षकांनी आतापर्यंत न पाहिलेली लोकेशन यामध्ये पाहायला मिळतात प्रमुख अभिनेत्यांसह अक्षय टांकसाळे, आनंद इंगळे, सायली संजीव, शिवानी सुर्वे या सह कलाकारांनी ही अतिशय समरस पणे आपल्या साकारल्या आहेत. महेश मांजरेकर सई ताम्हणकर यांच्या पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेमुळे चित्रपटाला चार चाँद लागले आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक केवळ आपले मनोरंजनच झाले यामुळे खुश होत नाही तर चित्रपटातून एक सकारात्मक विचार घेऊन चित्रपट गृहाच्या बाहेर पडतो