ह.भ.प. आसाराम महाराज खांदवे अनंतात विलीन

311

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या अलंकापुरीतील महान तपस्वी साधू ह. भ. प. आसाराम बाबा खांदवे यांचे बुधवार ( दि. १५ ) रोजी इहलोकीची यात्रा संपून वैकुंठ गमन झाले आहे. त्यांचे अनंतात विलीन होण्याचा सोहळा इंद्रायणीच्या घाटावर हजारो वारकरी, साधुसंत, भगवत भक्त तसेच बाबांचे शिष्य परिवार नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे, जालना व इतरही जिल्ह्यातील लोकांच्या साक्षीने पार पडला.
आसाराम बाबा यांचे मूळ गाव जालना जिल्ह्यातील असून त्यांचे संपूर्ण जीवन पंढरपूर आणि आळंदीतच गेलेले आहे. त्यांनी नैष्टिक ब्रह्मचर्याचे पालन करून वारकरी संप्रदायाचे बीज अनेक सामान्य जनांमध्ये रोवण्याचे महान कार्य केले आहे. यामुळे ते आजही व पुढे ही समाजात अजरामर राहतील. त्यांचे अनंतात विलीन होण्याचे सोहळ्या निमित्त त्यांचे कुबेर गंगातीरी केळगाव येथील आश्रमात अखंड हरिनाम गजर होत आहे. यात गुरुवार ( दि. १६ ) पासून पुढील १४ दिवस काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, हरिपाठ व सायंकाळी किर्तन असा धार्मिक कार्यक्रम होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली अर्पण केली.