लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचा 129 वा स्थापना दिवस

156

पुणे प्रतिनिधी,

1895 पासून देशाच्या सेवेत कार्यरत असलेले आणि भारतीय लष्कराच्या प्रमुख मुख्यालयापैकी, एक पुणे येथील दक्षिण मुख्यालय (सदर्न कमाड) आज 01 एप्रिल 2023 रोजी आपला 129 वा स्थापना दिवस साजरा केला. या ऐतिहासिक प्रसंगी, शूरपणाने आणि आत्मसन्मानाने मातृभूमीच्या सेवेसाठी आपल्या प्राणाचे बलिदान करणाऱ्या शूर हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

दक्षिण कमांड ही भारतीय लष्कराची सर्वात जुने आणि सर्वात मोठे लष्करी मुख्यालय आहे, जे भारतातील अकरा राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेला सुमारे 40% भूभाग व्यापते. सुमारे 129 वर्षांचा इतिहास आणि गौरवशाली परंपरा असलेला हे कमांड शौर्य, त्याग आणि निःस्वार्थ सेवेचे जिवंत उदाहरण आहे. वर्षानुवर्षे, या कमांडने बदलत्या काळानुसार येणाऱ्या परिस्थितीशी झपाट्याने स्वत:ला जुळवून घेतले आहे. स्वतःला समकालीन तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींशी सुसंगत ठेवत आपली क्षमता आणखी वाढवली आहे.

या कमांडने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात विविध लष्करी मोहिमांमध्ये यशस्वीरित्या भाग घेतला आहे. ज्यामध्ये वर्ष 1947 – 48 मध्ये जुनागढ आणि हैदराबादचे एकत्रीकरण, 1961 मध्ये गोवा मुक्ती, 1965 आणि 1971 चे भारत-पाक युद्ध, पवन, विजय, पराक्रम यासारख्या लष्करी मोहिमांचा समावेश आहे. भूज भूकंप असो, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि बंगळुरूमध्ये आलेला पूर असो, तौक्ते चक्रीवादळ असो किंवा मोरबी पूल कोसळणे असो, शूर सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या पाठीशी उभे राहिले आणि भविष्यातल्या कोणत्याही कठीण प्रसंगी हे सैनिक आपली कामगिरी अशीच चोखपणे बजावत राहतील.

जनतेच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याच्या वचनबद्धतेसह, कमांड कार्यक्षेत्रात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्यात पर्यावरण संरक्षण, रक्तदान, शासनाच्या शाळांमधील शिक्षण सुधारणा, दुर्गम गावांपर्यंत व्यवस्था पोहोवणे आदी सामाजिक कारणांसाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणून त्यांना या कामात सहभागी केले जाते. यानिमित्ताने खास पुणेकरांसाठी 31 मार्च ते 02 एप्रिल 23 या कालावधीत पुणे रेसकोर्सवर आर्मी बँडचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय सैन्याचे जनसामान्यांशी असलेले नाते आणखी दृढ करण्यासाठी विशेष प्रदर्शन आणि शो आयोजित केले जाणार आहेत.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना, दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ,एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, लेफ्टनंट जनरल ए के सिंग यांनी सर्व नागरिक आणि सैनिकांनी ‘आत्म निर्भार भारत’ मिशन पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.

दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल ए के सिंग यांच्या वतीने मेजर जनरल हिरदेश सहानी यांनी आदरांजली वाहिली.

***