भारताच्या वाटचालीची दिशा आणि स्थिती काय असावी हे ठरवण्याचा अधिकार परदेशी प्रसार माध्यमांना नाही- अनुराग ठाकूर

135

भारतातील अंतर्गत बाबींसंदर्भातील परदेशी प्रसारमाध्यमांच्या हस्तक्षेपाबाबत माहिती आणि प्रसारण आणि क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले की भारताची पुढे पडणारी पावले काही परदेशी शक्तींना रुचलेली नाहीत आणि कोणतेही परदेशी प्रसार माध्यम भारतीय न्यायालयापेक्षा मोठे नाही, घटनात्मक संस्थांच्या कार्यप्रणालीत हस्तक्षेप सहन केला जाणार नाही.

नव्या भारताविषयी बोलताना केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, “भारत आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली अतिशय वेगाने पुढे जात आहे. 76% जागतिक मान्यतेच्या मानांकनासह पंतप्रधान मोदी यांना जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून मान्यता मिळाली आहे. भारताची ही पुढे पडणारी पावले काही परदेशी शक्तींना आवडलेली नाहीत. काही परदेशी प्रसारमाध्यमे कुटील हेतू- अपप्रचारांतर्गत भारताची बदनामी करण्यात सहभागी आहेत. मात्र, परदेशी प्रसारमाध्यमांना भारताची वाटचाल आणि स्थिती कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार नाही. आज भारतामध्ये ना ज्ञानाची तफावत आहे  ना डिजिटल मागासलेपण आहे, ना तंत्रज्ञानाचे मागासलेपण आहे. आज भारताकडे ते सर्व काही आहे जे एका विकसित देशाकडे असते. सर्वात मोठी बाब म्हणजे आज भारतात एक राष्ट्रवादी विचारसरणी असलेले, समाजाला जोडणारे सरकार आहे जे भारताला विश्व गुरु बनवण्यासाठी सक्षम आहे.”

पुढे बोलताना भारतामध्ये परदेशी प्रसारमाध्यमांच्या हस्तक्षेपाबाबत तीव्र प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले, “ आज देखील भारतात अशा अनेक परदेशी प्रसारमाध्यम संस्था आहेत ज्या भारतविरोधी विचारांसह काम करत आहेत. त्यांनी अशा प्रकारे आपले एक जाळे तयार करून ठेवले आहे की आपल्या चुकीच्या कामांबाबत सरकारने चौकशी केल्यावर देखील आरडाओरडा करतात आणि संपूर्ण जगाला सांगतात की भारतात प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात आहे. आपल्या चुकीच्या कामांवर प्रसारमाध्यमांच्या नावाचे पांघरुण घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

याच चूकीच्या भावनेतून कुठलाही वैज्ञानिक आधार नसलेले काही कपोलकल्पित अहवाल जाहीर केले जातात. देशातील प्रसार माध्यमांनी कोणत्याही परदेशी प्रसार माध्यमांना आपल्या देशाचे नरेटीव्ह अर्थात कथन ठरवण्याची संधी देऊ नये. 

परदेशी प्रसार माध्यमे ज्याप्रमाणे निवडक भारतीय बातम्यांना चुकीच्या पद्धतीने चुकीचा रंग चढवत खळबळजनक बनवतात, आपली प्रसार माध्यमे त्यांच्या बातम्यांना छोटेसे तरी स्थान देतात का ? उदाहरणार्थ, अमेरिकेत सध्या बंदुकीचा दहशतवाद खूपच फोफावला आहे. पण याची चर्चा भारतात किंवा जागतिक स्तरावर झालेली तुम्ही पाहिले आहे का ? ” असा सवाल अनुराग ठाकूर यांनी केला. परदेशी प्रसार माध्यमे वसाहतवादी विचारसरणीचे पाईक असल्याचेही त्यांनी सांगितले.

तुम्हा सर्वांना फायझरची लस आठवतच असेल. ही लस भारतात आणण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. स्वदेशात निर्मित भारतीय लसींच्या बाबत गैरसमज पसरवण्यात आले. माहितीच्या प्रवाहावर पाश्चिमात्य देशांचे वर्चस्व असल्यामुळे हे शक्य झाले होते. आपणा सर्वांना हे वर्चस्व खोडून काढायचे आहे. हा माहितीचा प्रवाह जोपर्यंत आपल्या प्रभावाखाली येत नाही तोपर्यंत आपला भारत विश्व गुरु बनू शकणार नाही, असे अनुराग ठाकूर यांनी पाश्चिमात्य वर्चस्व आणि माहितीच्या प्रवाहाबद्दल बोलताना सांगितले. 

परदेशी प्रसार माध्यम कंपन्या, विशेष करून ज्यांचा भारताबाबत घृणा बाळगण्याचा इतिहास आहे, अशा ठिकाणचे पत्रकार भारताबाबतीत ज्या चुकीच्या बातम्या लिहितात ते पत्रकार बहुसंख्य भारतीयच किंवा भारतीय वंशाचे असतात. त्यांची व्यक्तिगत माहिती जाणून घेतली तर आपल्याला समजेल की हे पत्रकार भारत आणि भारतीय, खास करून हिंदू, यांच्या बाबतीत आपल्या मनात घृणा बाळगतात. आणि केवळ एकतर्फी बातम्या लिहितात. काही परदेशी प्रसार माध्यम संस्था आणि काही देशी न्यूज पोर्टल भारतीय विचारसरणी आणि भारतीय समाजाच्या विरोधात एका रणनीतीनुसार कार्य करत आहेत, हे आपल्याला मान्य करावे लागेल. हे शब्दात सांगायला कोणालाही संकोच वाटायला नको, असेही ते म्हणाले