जी 20 शिक्षण कार्य गटाच्या परदेशी पाहुण्यांनी पुण्यामध्ये वारसा स्थळांना दिली भेट

113

पुण्यात सुरू झालेल्या जी20 शैक्षणिक कार्य गटाच्या बैठकीच्या आजच्या पहिल्या दिवशी सकाळी उपस्थित परदेशी प्रतिनिधींनी पुण्यातील वारसा स्थळांच्या भेटीचा अनुभव घेतला.

पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यावर ढोल लेझीमच्या निनादात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. स्थानिक लोककलांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. शनिवारवाड्याची संपूर्ण माहिती यावेळी पाहुण्यांनी जाणून घेतली.

शनिवारवाड्यानंतर परदेशी पाहुण्यांनी लाल महाल आणि नाना वाड्याची पाहणी केली. लाल महालाशी संबंधित छत्रपती शिवरायांचा बालपणीचा इतिहास परदेशी पाहुण्यांनी आस्थेने जाणून घेतला. ऐतिहासिक नाना वाड्याचे महत्व देखील त्यांना समजावून सांगण्यात आले.

पुण्याच्या विविध शाळांमधील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना आणि एनसीसीचे छात्र यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणेकरांनीसुद्धा या पाहुण्यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. पुणेकरांचे हे आदरातिथ्य पाहून परदेशी प्रतिनिधी भारावून गेले.

50 देशातील सुमारे 150 परदेशी पाहुणे या वारसा स्थळांच्या सफरीत सहभागी झाले होते.

***