रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे कार्यालयात ‘आधार शिबिर’ व ‘डाक जीवन विमा’ विषयक कार्यशाळेचे आयोजन

428

डाक सेवेच्या संबंधित सरकारी धोरण आणि सुविधांविषयी जनतेमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी 19 जून 2023 रोजी रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे कार्यालयात ‘डाक जीवन विमा’ या विषयावर एक अतिशय महत्त्वपूर्ण कार्यशाळा आणि आधारची माहिती अद्ययावतीकरण व नोंदणीकरण करण्यासाठी ‘आधार शिबिरा’चे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे आणि प्रधान डाक कार्यालय (जीपीओ) पुणे यांच्या द्वारे संयुक्त रूपाने केले गेले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे रक्षा लेखा प्रधान नियंत्रक डॉ राजीव चव्हाण, आयडीएएस, एनडीसी; पोस्ट मास्टर जनरल श्री आर सी जायभाय, आयपीओएस आणि अन्य भारतीय रक्षा लेखा सेवेच्या अधिकाऱ्यांद्वारे दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर रक्षा लेखा वरिष्ठ उपनियंत्रक श्री ओंकार मोघे आयडीएएस यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचे स्वरूप व त्याच्या उपयोगितेविषयी सविस्तर माहिती दिली.
रक्षा लेखा अपर नियंत्रक श्रीमती पनवीर सैनी, आयडीएएस यांनी आपल्या भाषणामध्ये या कार्यक्रमाच्या संयुक्त आयोजनासाठी रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे कार्यालय व प्रधान डाक कार्यालय, पुणे यांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये या कार्यक्रमामुळे जागरूकता निर्माण होईल आणि त्यांच्यात आर्थिक नियोजनाविषयी जागरूकता निर्माण होईल. आधार शिबिराच्या आयोजनाचे महत्त्व सांगताना त्यांनी म्हटले की आधार ही या देशातील सर्वात मोठी बायोमेट्रिक प्रणाली आहे आणि त्यामध्ये नागरिकांच्या माहितीचे अद्ययावतीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी सर्वांना या शिबिराचा लाभ घेऊन आपली व आपल्या कुटुंबीयांची माहिती देऊन ‘आधार कार्ड’ अद्ययावत करण्यासाठी प्रेरित केले.
पोस्ट मास्टर जनरल श्री आर सी जायभाय, आयपीओएस यांनी आपल्या भाषणामध्ये डाक जीवन विमा योजनेच्या संबंधित अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की पूर्वीच्या नियमाप्रमाणे फक्त केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकत होते, परंतु आता कोणताही पदवीधारक या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून लाभ घेऊ शकतो. प्रीमियमचे पेमेंट करण्यासाठी ऑनलाइन सुविधासुद्धा उपलब्ध आहे. त्यांनी पुढे सांगितले की एक ग्राहक डाक जीवन विमा योजनेच्या आधारावर दहा टक्के सामान्य व्याजदराने कर्ज प्राप्त करू शकतो; जे अन्य बँकांच्या व्याजदरापेक्षा कमी व लाभदायक आहे. डाक जीवन विमा योजना फक्त एक विमा योजना नसून ती गुंतवणूक करण्यासाठी एक हितकर विकल्प आहे. याबरोबरच पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याच्या माध्यमातून चार टक्के व्याजदर असा लाभही आपल्याला प्राप्त करता येऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली. आधार माहितीचे अद्ययावतीकरण करण्याबद्दल त्यांनी सांगितले की दर दहा वर्षांनी बायोमेट्रिक माहितीचे अद्ययावतीकरण करणे बंधनकारक आहे. आधार शिविर आयोजित करण्यासाठी त्यांनी प्रधान नियंत्रक डॉ राजीव चव्हाण, आयडीएएस, एनडीसी यांना धन्यवाद दिले.
या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या हेतूविषयी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रधान नियंत्रक डॉ राजीव चव्हाण यांनी आपल्या भाषणातून विस्तृत माहिती दिली. डाक विभागाच्या अभूतपूर्व योगदानाची प्रशंसा करत त्यांनी सांगितले की 1884 पासून आजपर्यंत इतक्या प्रदीर्घ कार्यकाळामध्ये डाक विभागाने जीवन विमा व सामान्य विमाद्वारे अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लोककल्याणाचे काम सफलतापूर्वक केलेले आहे. या विभागाने सामान्य नागरिकांना त्यांच्या विषम आर्थिक परिस्थितीमध्ये वित्तीय सहाय्य प्रदान केलेले आहे. कोणत्याही ग्राहकाभिमुख सेवा योजनेचा प्राथमिक उद्देश सामान्य जनतेपर्यंत संतोषजनक रीतीने सेवा पोहोचवणे हे असते. डाक विभागाने हे कार्य कौशल्यपूर्वक साध्य करून दाखविले आहे. त्यांनी पुढे पीएलआय स्कीमविषयी आयोजित कार्यशाळा आणि आधार शिबिराचा लाभ घेण्याचा सल्ला सर्वांना दिला. त्यांनी सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक जागरूकता व चिकित्सक वृत्ती बाळगण्याविषयी सल्ला दिला. शेवटी त्यांनी अशा हितकारक कार्यशाळा भविष्यातही आयोजित करण्याविषयी सर्वांना आश्वासन दिले.
यावेळी डाक विभागाचे पुणे शहर पूर्व विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डॉ अभिजीत इचके, रक्षा लेखा उपनियंत्रक श्रीमती सुनालिनी बोईड, आयडीएएस आणि रक्षा लेखा सहाय्यक नियंत्रक श्री ऋषिकेश देशमुख,आयडीएएस आयडीएस हे उपस्थित होते. डाक जीवन विमा कार्यशाळेतील सादरीकरणांमध्ये SURAKSHA, SUVIDHA, SANTOSH, SUMANGAL,SURAKSHA व CP यासारख्या अनेक PLI योजनांविषयी विस्तृत माहिती श्री संदीप रेपे यांच्याद्वारे दिली गेली. शेवटी रक्षा लेखा सहाय्यक नियंत्रक श्री स्वप्निल हनमाने, आयडीएएस यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.