पावसाळ्यात आपत्तीच्या परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देण्याची तयारी ठेवा-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

139

प्रॅनिल चौधरी, पुणे

 इरशाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व दरड प्रवण गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची माहिती घ्यावी आणि पावसाळ्यात कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

पालकमंत्री श्री.पाटील यांनी आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या तयारीबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यांनी जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती, धरणातील पाण्याची स्थिती, दरड प्रवण आणि पूरप्रवण गावांची माहिती घेतली.

तालुका पातळीवर प्रत्येक आठवड्यात दरड प्रवण गावांना भेटी देण्यात याव्यात. या गावांमध्ये धोक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. नागरिकांना आपत्तीच्या वेळी घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती देण्यात यावी. दरडी पडण्याचा धोका असलेल्या भागात पावसाच्यावेळी वाहतुकीसाठी रस्ते बंद ठेवावेत. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होणार नाही यादृष्टीने आवश्यक प्रतिबंध घालण्यात यावे. आपत्तीच्या वेळी प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक साधने आणि मनुष्यबळाचे नियोजन तयार ठेवावे. विशेषत: दरड प्रवण क्षेत्रात तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक यंत्रणा तयार ठेवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाबाबत करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात येवून दरड प्रवण आणि पूरप्रवण गावांबाबत आढावा घेण्यात आला. तालुका स्तरावर पथके तयार करून दरड प्रवण गावातील परिस्थितीची माहिती घेण्यात आली. आपत्तीच्यावेळी नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी जवळची सुरक्षित निवाऱ्याची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. दरड प्रवण गावांबाबत तालुका स्तरावरील नियंत्रण कक्षाद्वारे माहिती घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील डोंगर उतारावरील वाड्या, वस्त्या आणि गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
0000