द आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे सन्मान सोहळ्याचे आयोजन*
प्रनिल चौधरी पुणे :
गाईमुळे आपल्या जीवनात मांगल्य आहे, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये बरबटलेल्या शिक्षण पद्धतीमुळे हिंदू मूल्यांची चुकीची माहिती समाजासमोर येत होती, त्यामुळे गोमाता धोक्यात आली होती. परंतु आता हिंदूंचे राज्य आहे, अशा वेळी हिंदू संस्कृतीचे प्रतीक असणारी ही गोमाता संरक्षित करणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे, असे मत अयोध्येतील श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले.
द आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे म्हात्रे पूल येथील घरकुल लॉन्स मध्ये आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शेखर मुंदडा यांचा स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उद्योजक कृष्णकुमार गोयल, कृष्णकुमार बूब, मिलिंद एकबोटे, पी.डी.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय गायक विक्रम हाजरा यांच्या समवेत सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, आजच्या काळामध्ये सर्व पदार्थांवर मोठ्या प्रमाणावर रसायनांचा वापर केला जात आहे त्यामुळे कर्करोगाचे ही प्रमाण वाढत आहे. अशावेळी गायीचे तूप तसेच गाईचे शेण आणि गोमूत्र यांचा वापर वाढला पाहिजे. गोमातेचे महत्व समाजाला पटवून देणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारला शेखर मुंदडा यांच्या रूपाने एक हिरा मिळाला आहे. राज्य सरकारनेही तो हिरा चांगल्या कोंदनामध्ये बसवून गोमातेची सेवा करण्याची संधी त्यांना दिली आहे. गोमातेची सेवा करण्याची संधी मिळणे म्हणजे आयुष्याचे सोने होणे आहे, असेही त्यांनी सांगितले.
शेखर मुंदडा म्हणाले, राजकीय जीवनामध्ये पद येतात आणि जातात. परंतु गोमातेची सेवा माझ्या हातून घडते आहे, हे माझे भाग्य आहे. मी आतापर्यंत केलेल्या निस्वार्थ समाजकार्यामुळेच गोमातेचा आशीर्वाद या पदाच्या रूपाने मला मिळाला आहे. या पदाच्या माध्यमातून गोमातेची सेवा, संगोपन आणि संवर्धन करणे हे माझ्या जीवनाचे उद्दिष्ट आहे पूर्वी गो सेवकांकडे योग्य प्रकारे लक्ष दिले जात नव्हते. परंतु आता हिंदूंचे राज्य आल्यानंतर गो सेवकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही याची मी शाश्वती देतो, असेही त्यांनी सांगितले. प्रदीप नांगले, प्रशांत पाटील, श्रीधर दामोदरन, शशांक ओंभासे, महेश सोनी, अमित महाडिक, विश्वजीत रणधीर, कुमार लामकाने यांनी कार्यक्रमाकरिता विशेष परिश्रम घेतले.