*वंचित घटकाला विकासाच्या मार्गावर आणणे हेच विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट – केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे

75

 पुणे प्रतिनिधी,

कुपोषण, गरिबी आणि बेरोजगारी यांच्यावर जोरदार प्रहार करुन या गोष्टी समूळ नष्ट करणे, वंचित घटकाला विकासाच्या मार्गावर आणणे, हेच विकसित भारत संकल्प यात्रेचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केले.

पुणे शहरातील वडगाव शेरी येथील रामचंद्र सभागृहात विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुमार खेमनार, उपायुक्त नितीन उदास उपस्थित होते.

श्री. चौबे म्हणाले, केंद्र शासनातर्फे देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशातील वंचित घटकासोबतच आदिवासी, तृतीयपंथी आणि दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध लोककल्याणकारी योजनांची अमंलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेचा फायदा वंचित घटकातील नागरिकाला होत असून ते मुख्य प्रवाहात येत आहेत.

जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद घेऊन कोणत्याही कार्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. याच दृष्टिकोनातून देशातील गावागावांत विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. गावातच विविध योजनांचा लाभ मिळत असल्याने यात्रेला नागरिकांचा उत्सर्फूत प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद विचारात घेता यात्रेचा कालावधी वाढविण्यात येईल, असे चौबे यांनी म्हटले.

यावेळी श्री. चौबे यांनी कार्यक्रमस्थळी विविध योजनेअंतर्गत लावण्यात आलेल्या शिबिरांची पाहणी केली. तसेच पंतप्रधान उज्ज्वला योजना, पंतप्रधान स्वनिधी योजना, आयुष्मान भारत योजनेच्या विविध दालनांना भेट दिली, तसेच लाभार्थ्यांशी थेट संवादही साधला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लाभार्थ्यांशी दुरदृश्यप्रणालीद्वारे संवाद कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.