एक इंच हि मागे हटणार नाही; मराठा समाजाचे आरक्षणासाठी वेळप्रसंगी देह ही ठेवेल : मनोज जरांगे पाटील

338

आळंदीत भव्य जल्लोषात मिरवणूक

अर्जुन मेदनकर ,आळंदी

 कोणत्याही नेत्याला नि पक्षाला जुमानत नाही. मराठा आरक्षणासाठी देह ठेवण्याची वेळ आली तरी आता मागे पुढे पाहणार नाही.आता आरक्षण घेतल्या शिवाय एक इंच हि मागे हटणार नाही असा खणखणीत इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा दौरा सुरु असून या दौ-यात तीर्थक्षेत्र आळंदीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. नगरप्रदक्षिणा मार्गावरून भव्य मिरवणूक वाजत गाजत जल्लोषात फ्रुट वाले धर्मशाळा येथून हजेरी मारुती मंदिर मार्गे पोलीस चौकी समोरून नगरपरिषद चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज अर्ध पुतळा स्मारक येथे मिरवणुकीची सांगता झाली. येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन त्यांनी केले. सकल मराठा समाज आळंदी यांचे वतीने जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी सकल मराठा समाज, खेड, आळंदी, चाकण परिसरातील नागरिक, पदाधीकारी उपस्थित होते. जरंगे पाटील यांचा यावेळी आळंदी ग्रामस्थ तसेच सकल मराठा समाज यांचे वतीने सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी जरांगे पाटील यांनी हजेरी मारुती मंदिरात दर्शन घेतले येथे हजेरी मारुती मंदिर मध्ये ही ग्रामस्थांचे वतीने सत्कार झाला.
यावेळी ते म्हणाले, सगेसोयरे यांचे साठी अध्यादेश काढण्यात आला आहे. पंधरा तारखेला अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात होणार आहे. मराठा आरक्षणाची भूमिका त्यांनी सांगितली. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.
मिरवणुकीत एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा युवक तरुणांनी देत जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी, ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. यावेळी पारंपरिक खेळ ठिकठिकाणी सदर करण्यात आले. विविध ठिकाणी नागरिकांनी पुष्पहार घालून जरांगे पाटील यांचे स्वागत जल्लोषात केले. यावेळी आळंदीसह परिसरातही मराठा समर्थक तसेच इतरही समाजातील मान्यवरांनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले. यावेळी रस्त्याचे दुतर्फा नागरिकांनी मिरवणूक पाहण्यास मोठी गर्दी केली होती. आळंदी शहर सकल मराठा समाज यांचे वतीने स्वागत, सत्कार, भव्य मिरवणूक आणि रात्रीचे मुक्कामाची मोठी व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. आळंदी शहर पोलीस प्रशासनाने मिरवणुकी दरम्यान मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आळंदी परिसरातील नागरिकांसह महिलांनीही आपल्या कुटुंबातील घटक समजून जरांगे पाटलांचे आगमन निमित्त जल्लोषात स्वागत करण्यास रस्त्यावर आले होते.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सकाळी अंतरवाली येथून निघून शिक्रापूर मार्गे आळंदीत आले होते. प्रवासा दरम्यान अनेक ठिकाणी त्यांचे विविध गावांतून स्वागत झाले. आळंदी येथील शनिवारचे मुक्कामा नंतर रविवारी ( दि. ७ ) आळंदी येथून चाकण मार्गे खोपोली, पनवेल मार्गे कामोठे येथे सकाळी अकरा वाजता नियोजित कार्यक्रम त्यानंतर नवी मुंबई मार्गे-चेंबूर मार्गे- शिवाजी मंदिर, दादर मुंबई येथे संध्याकाळी सहा वाजता नियोजित कार्यक्रमास पोहोचणार आहेत.