कोंढव्यातील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण ; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

426

अनिल चौधरी, कोंढवा

नरवीर तानाजी मालुसरे चौक ते कोंढवा खुर्द गावठाण ,मिठानगर या भागामध्ये दररोजच्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले असून अग्निशामक दलाची वाहने , रुग्णवाहिका देखील तासांतास वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत. दररोजच्या वाहतूक कोंडीने स्थानिक नागरिक हैराण झाले असून वाहतूक पोलिसांनी तसेच कोंढवा पोलिसांनी यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक मा नगरसेवक तानाजी लोणकर, भरत आप्पा चौधरी , भाजपा युवा नेते अक्षय शिंदे ,संतोष गोरड , तुकाराम लोणकर, हनुमंत लोणकर, सा.कार्यकर्ते सागर लोणकर यांनी वाहतूक शाखेच्या उपायुक्ततांकडे केली आहे. 

   नरवीर तानाजी मालुसरे चौक ते कोंढवा खुर्द गावठाण हा मुख्य रस्ता सासवड, खडीमशन , कात्रज , फुरसुंगी, उंड्री पिसोळी, मिठानगर, अप्पर, भाग्योदयनगर येथे जाणाऱ्या नागरिकांसाठी   सोयीचा असून नागरिक हा रस्ता मोठ्या प्रमाणात याचा वापर करतात . परंतु दररोज संध्याकाळी येथे वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करतात. भाजपाचे युवा नेते अक्षय शिंदे म्हणाले कि, कोंढवा वाहतूक विभागाचे वाहतूक पोलिस निरीक्षक यांची नुकतीच बदली झाली असून याठिकाणी कोणाचीच नियुक्ती झालेली नाही. यामुळे या रस्त्यावर वाहतूक पोलीस दिसत  नाहीत. वाहतूक पोलीस नसल्याने रोज वाहतूक कोंडी होत आहे. पोलीस शिपायांनी याठिकाणी उपस्थित राहून येथील वाहतूक कोंडी सोडवली पाहिजे तसे न होता वाहतूक पोलीस आपल्या चौकीतच राहणे धन्य मानतात . तर कोंढवा वाहतूक पोलिसांचा कारभार रामभरोसे असल्याची टीका मा नगरसेवक भरत चौधरी यांनी केली आहे, तसेच दोन दिवसात जर वाहतूक पोलीस निरक्षकाची नियुक्ती केली नाही तर मोठे जनआंदोलन आम्ही करू असा इशारा देखील त्यांनी दिला. तानाजी लोणकर यांनी देखील वाहतूक पोलीसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली असून कोंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या शी संपर्क करून तातडीने उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. शिवसेना युवा नेते प्रसाद बाबर यांनी देखील वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली असून वाहतूक पोलिसांनी मालुसरे चौक , कोंढवा गावठाण , भैरवनाथ मंदिराजवळ तसेच भाग्योदय नगरला जाणाऱ्या रस्त्यावर त्वरित वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. भाजपाचे युवा नेते अक्षय शिंदे म्हणाले मी तसेच ग्रामस्थ वाहतूक उपायुक्तांनी त्वरित भेट घेऊन कोंढव्यातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करणार असल्याची माहिती दिली.