केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून अनेक इशाऱ्यानंतर, अश्लील आणि असभ्य आशयाच्या प्रदर्शनाबद्दल 18 ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक
आयटी कायदा, भारतीय दंड संहिता आणि महिलांचे अशोभनीय प्रदर्शन(प्रतिबंध) कायद्याचे उल्लंघन करणारे आशय
अश्लील, असभ्य आणि काही प्रकरणात पोर्नोग्राफिक आशयाचे प्रसारण करणाऱ्या 18 ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने(I&B) विविध मध्यस्थांच्या समन्वयाने कारवाई केली आहे. या प्लॅटफॉर्म्सशी संबंधित असलेल्या 19 वेबसाईट्स, 10 ऍप्स (गुगल प्ले स्टोअरवरील 7, ऍपल ऍप स्टोअरवरील 3) आणि 57 सोशल मीडिया अकाऊंट्स भारतात वापरण्यासाठी निष्क्रीय करण्यात आली आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी वारंवार यावर भर दिला आहे की ‘सर्जनशील अभिव्यक्ती’ च्या नावाखाली अश्लील, असभ्य आणि गैरवर्तनाचा प्रसार होणार नाही यांची जबाबदारी या प्लॅटफॉर्म्सची आहे. 12 मार्च, 2024 रोजी ठाकूर यांनी अश्लील आणि असभ्य आशयाचे प्रसारण करणारे 18 ओटीटी प्लॅटफॉर्म्स बंद करत असल्याची घोषणा केली. माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 मधील तरतुदींअंतर्गत भारत सरकारची इतर मंत्रालये/विभाग आणि प्रसारमाध्यम आणि मनोरंजन, महिलांचे अधिकार आणि बालकांचे अधिकार या क्षेत्रातील तज्ञ यांच्याशी सल्लामसलत करून अलीकडेच हा निर्णय घेण्यात आला.
List of OTT Platforms
Dreams Films | Voovi | Yessma | Uncut Adda | Tri Flicks | X Prime |
Neon X VIP | Besharams | Hunters | Rabbit | Xtramood | Nuefliks |
MoodX | Mojflix | Hot Shots VIP | Fugi | Chikooflix | Prime Play |
आशयाचे स्वरुप
या प्लॅटफॉर्म्सवरून प्रसारित होत असलेले बहुतेक कार्यक्रम अश्लील, असभ्य आणि महिलांचे अशोभनीय पद्धतीचे चित्रण करणारे असल्याचे आढळले. यामध्ये नग्नता आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील अनैतिक नातेसंबंध, अनैतिक कौटुंबिक नातेसंबंध इ. सारख्या अनुचित संबंधांमध्ये लैंगिक कृतींच्या चित्रिकरणाचा समावेश होता.
यावरील आशयांमध्ये कोणत्याही संदर्भाविना किंवा सामाजिक प्रासंगिकतेविना लैंगिकता आणि प्रदीर्घ लांबीची पोर्नोग्राफिक आणि लैंगिकतेवर आधारित दृश्यांचा समावेश होता.
आयटी कायद्याचे कलम 67 आणि 67ए, कलम 292 आणि महिलांचे अशोभनीय प्रदर्शन (प्रतिबंध) कायदा, 1986 चे कलम 4 चे हे आशय उल्लंघन करत असल्याचे प्रथमदर्शनी निश्चित झाले आहे.
लक्षणीय दर्शकसंख्या
या ओटीटी ऍप्सपैकी एकावर गुगल प्लेस्टोअरवर एक कोटी डाऊनलोड्सची तर इतर दोनवर 50 लाख डाऊनलोड्सची नोंद झाली आहे. त्याव्यतिरिक्त या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी त्यांचे ट्रेलर्स, विशिष्ट दृश्यांचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाचा आणि त्यांच्या वेबसाईट आणि ऍप्सकडे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी एक्स्टर्नल लिंक्सचा अतिशय मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या सोशल मीडिया अकाउंट्सची संचित सदस्य संख्या 32 लाखांवर पोहोचली आहे.
Social Media Platform | Number of Accounts |
12 | |
17 | |
X (formerly Twitter) | 16 |
YouTube | 12 |
ओटीटी प्लॅटफॉम्ससोबत सातत्याने संपर्क
माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 अंतर्गत स्थापन झालेले ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि त्यांच्या स्वयं – नियामक संस्थांसोबत माहिती आणि प्रसारण मंत्रालय बैठका, वेबिनार, कार्यशाळा इत्यादींच्या माध्यमातून सातत्याने जबाबदारीचे भान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. ओटीटी उद्योगाची वृद्धी आणि विकासाला चालना देण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे. या संदर्भात 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वेब सीरीजसाठी पुरस्कार देण्याची सुरुवात, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील ओटीटी प्लॅटफॉर्म्ससोबत सहकार्य आणि आयटी नियम, 2021 अंतर्गत स्वयं नियमनावर भर देत सौम्य नियामक चौकटीची स्थापना यांसह अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
***