तळोजा एमआयडीसीमध्ये सुरक्षारक्षकाची निर्घृण हत्या

1180

 गिरीश भोपी :-

तळोजा:  तळोजा एमआयडीसी मधील किम केमीकल कंपनीतील सुरक्षा रक्षकाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली असून पोलीसांना केवळ आठ तासांच्या आत आरोपीला पकडण्यात यश आले आहे. 

तळोजा एमआयडीसीमधील किम केमीकल प्लॉट नंबर जी १३/१६, या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या हरीनारायण सुखदेव गुप्ता (वय २५) मुळचा बिहार, मधुबनी येथील असणाऱ्या खाजगी सुरक्षा रक्षकाची कामावर असताना अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. तीक्ष्ण हत्याराने त्याचे लिंग कापून व डोक्यावर पाठीमागे वार करून ही हत्या करण्यात आली. .

घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय कुमार यांच्यासह सह आयुक्त डॉ सुरेश मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे उपायुक्त सुनिल लोखंडे, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय कदम, गुन्हे शाखेचे कक्ष तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने व तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू अडागले यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत आज सकाळी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार तपासाची सुत्रे हलायला सुरुवात झाली. तपास करतेवेळी मयत सुरक्षा रक्षकाचा साथीदार लोलारकनाथ याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलीसी खाक्याने त्याची चौकशी केली असता त्याने हत्या केली असल्याचा गुन्हा कबूल केला आहे.
आरोपी लोलारकनाथ सुर्यमणी गुप्ता (वय ४६) हा कंपनीतच राहत होता. मयत सुरक्षा रक्षक याचे दारू पिण्याचे व्यसन व त्याची बाहेरख्याली वृत्ती यामुळे दोघांमध्ये यापूर्वी वाद झाले. या रागातूनच आपण त्याचा खून केला असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असुन त्याच्या विरोधात भादंवि ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू तडवी पुढील तपास करीत आहेत.