“थॅक्स गिव्हींगला आलोय” -पशु संवर्धनमंत्री महादेव जानकर

1115

अनिल चौधरी, पुणे :-

खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना “चिअर अप” करण्यासाठी आणि या युवकांना ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना “थँक्स गिव्हींग”साठी आलो असल्याची उत्स्फुर्त प्रतिक्रीया पशु संवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर यांनी आज दिली.
महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्सला पशु संवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी येथे सुरू असणाऱ्या व्हॉलीबॉल, बॉक्सिंगच्या मैदानांना भेट देवून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, मुख्यमंत्री कार्यालयाच्या समन्वयक राणी व्दिवेदी उपस्थित होत्या.
श्री महादेव जानकर म्हणाले, खेलो इंडियाच्या माध्यमातून ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी सुरु आहे, यानिमित्ताने संपुर्ण देशातील तळागाळातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना केंद्र सरकारच्या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळणार आहे. या शिष्यवृत्तीचा मोठा फायदा त्यांना आपले खेळातील करिअर करण्यासाठी होणार आहे. केंद्र शासनाने ही स्पर्धा भरविण्याची संधी महाराष्ट्राला दिली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजनाची संधी स्वीकारून खेळाडूंसाठी संधीची दारे खुली केली. त्यानिमित्त मी सर्व खेळाडूंच्यावतीने प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो.
खेलो इंडिया स्पर्धेचे नियोजन कमी वेळात अत्यंत उत्कृष्ट पध्दतीने केले आहे, त्यासाठी क्रीडा विभागाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी कौतुकास पात्र आहेत. चांगल्या पध्दतीची सोय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. खेलो इंडियाच्या माध्यमातून नवी क्रीडा संस्कृती राज्यात निर्माण झाली आहे. या निमित्ताने सुदृढ समाज निर्मिती होणार आहे.
आपल्या महाराष्ट्राने खेलो इंडियाच्या पदक तालिकेत अव्वल स्थान मिळविले असून या निमित्ताने देशभरातील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी त्यांना मिळाली आहे. यामुळे येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे खेळाडू भरपूर पदके मिळवतील, असा विश्वास श्री जानकर यांनी व्यक्त केला..