महाराष्ट्राचा “भारत छोडो” चित्ररथ सज्ज

1022

अनिल चौधरी,

नवी दिल्ली, 22 : ‘वंदेमातरम’ च्या सुरात 1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाचा इतिहास जीवंत करणारा चित्ररथ महाराष्ट्राने तयार केला आहे. ‘करेंगे या मरेंगे’, ‘भारत छोडो’ अशा घोषणांच्या निनादात स्वातंत्र्याची चळवळच यावर्षी राजपथावर अनुभवास मिळणार आहे.

यावर्षी गणतंत्र दिनी महाराष्ट्रासह 16 राज्यांचे आणि 6 केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण 22 चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क विभागाचे संचालक नम्पीबौ मरिनमई यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 40 कारागीरांनी अतिशय आकर्षक चित्ररथ उभारला आहे.
असा आहे चित्ररथ
चित्ररथाच्या पुढील भागात दृढ निश्चय व करूणामयी स्वभाव दर्शविणारा व भारत छोडोची घोषणा देणारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची मोठी प्रतिमा उभारण्यात आली आहे. चित्ररथाच्या मध्यभागी एकतेचे प्रतिक असणारा ‘चरखा’ उभारण्यात आला आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात मुंबईची खास ओळख ‘गेट वे ऑफ इंडिया’ ची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. तसेच 1942 मध्ये तत्कालीन गवालीया टँक अर्थात ऑगस्ट क्रांती मैदानवर झालेले ‘छोडो भारत चळवळी’ ची भव्यता दर्शविणारा जनसागर चित्ररथाच्या दोन्ही बाजुस विविध म्युरल्सच्या माध्यमातून दर्शविण्यात आला आहे.
35 कलाकार जागवणार भारत छोडोचा इतिहास

चित्ररथावर घोषणा देणारे स्वातंत्र्य सैनानींची व इंग्रज पोलीस अधिका-यांची भूमिका साकारण्यात येणार आहे. याशिवाय चित्ररथाच्या दोन्ही बाजुला ‘करेंगे या मरेंग’, ‘भारत छोडो’ अशा घोषणा देणारे एकूण 35 कलाकार हा भारत छोडो चळवळीचा ऐतिहासिक लढा साकारणार आहेत. मुंबई येथील ‘ व्हिजनरी पफॉर्मींग आर्ट’ गृपचे 35 कलाकार या भूमिका साकारणार आहेत.
वंदेमातरम’ गीत असणार आकर्षण

देश प्रेमाणे ओतप्रोत ‘वंदे मातरम…..’ या राष्ट्रगाणाची धूनही राजपथावर या चित्ररथासह सादर होणार आहे. प्रसिध्द संगीतकार अजय-अतुल यांनी ही धून तयार केली आहे.

‘भारत छोडो’ आंदोलनातील महाराष्ट्राचे योगदान अधोरेखीत करणारा चित्ररथ सर्वांचे आकर्षण ठरेल असा विश्वास कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी व्यक्त केला. मुंबई येथील फिल्म डिव्हीजन मध्ये उपलब्ध असलेल्या डॉक्युमेंटरी आणि मनीभवन येथील दस्तऐवज यांचा अभ्यास करून राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखना चित्ररथ तयार झाल्याचे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालक स्वाती काळे यांनी सांगितले .