विनापरवाना वृक्षतोडी करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला पालिकेची नोटीस

1016

गिरीश भोपी, पनवेल 

     पनवेलमधील कामोठे परिसरात पनवेल महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची परवानगी न काढता बेकायदेशीर वृक्ष तोड होत असल्याचे वृत्त वेळोवेळी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर पनवेल महानगर पालिकेने कामोठे शहरातील अमृतवेल को.ऑप.हौ. सो. प्लॉट नंबर २५ ग्रीन स्केप जवळ कामोठे नवी मुंबई येथे विकासक राम जोशी यांनी केलेल्या बेकायदा वृक्षतोडीबाबत खुलासा व परवानगीचे पत्र मागितले आहे. पनवेल महानगर पालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरणाकडे खुलासा व परवानगी घेतली असल्यास त्याची प्रत नोटीस दिल्यापासून ७ दिवसांमध्ये सादर करावी अन्यथा विकासकावर वृक्ष प्राधिकरण निमयानुसार फोजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे या नोटिसीमार्फत कळवले आहे. दरम्यान याबाबत विकासकाचे मत विचारले असता आम्ही वकिलांमार्फत पनवेल महापालिकेला खुलासा सादर करू व आम्ही परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी यावेळी मान्य केले. त्यामुळे खुलासा सादर केला तरी कोणालाही अडथळा ठरत नसलेलं झाड परवानगी न घेता तोडल्याबद्दल पनवेल महानगर पालिका गुन्हा दाखल करणार का याकडे लक्ष लागले आहे.

     तक्रारदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल महानगर पालिका कामगार कर्मचारी सेना कोषाध्यक्ष यांना याबाबत विचारले असता विकासक राम जोशी यांनी कोणतीही परवानगी न घेता झाडांची कत्तल केली आहे त्यामुळे त्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे मात्र प्रशासन त्यांना वेळ देत आहे. विकासक राम जोशी हे सिडकोचे निवृत्त कर्मचारी देखील आहेत त्यामुळे त्यांना झाड तोडण्यासाठी काय करावे लागते व कोणाची परवानगी लागते हे माहीत असूनही त्यांनी विनापरवाना झाड तोडले असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आग्रही राहील व पनवेल महानगरपालिका जर का वेळकाढूपणाचे धोरण राबवत असेल तर मनसेतर्फे याबाबत आंदोलन घेतले जाईल. विकासक राम जोशी यांना पालिकेने २१ जानेवारी २०१९ रोजी नोटीस काढली असून त्यांच्यावर काय कारवाई होते याबाबत आता लक्ष लागून राहिले आहे.