शहराच्या दक्षिण भागातील गावमधील पाझर तलावाचे संवर्धन केल्यास महापालिकेवरील पाण्याचा ताण कमी होईल

1128

मल्हार न्यूज विशेष 

सध्या पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा ताण येत असल्याचे चित्र दिसत आहे.महापालिका हद्दीलगतची दक्षिण भागातील डोंगरमाथ्यालगतची गावे पालिकेत समाविष्ट झाली आहेत.तर काही पालिका हद्दीत समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याचे संकट वाढतच जाणार आहे.त्यासाठी या गावांच्या परिसरात शेतीसाठी व्यवस्था करण्यात आलेल्या बंधा-यांचे आताच सरंक्षण आणि संवर्धन केल्यास महापालिकेवर येणारा पाणीपुरवठ्याचा ताण काही प्रमाणात कमी होईल.अशी आशा जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे. 

         शहराच्या दक्षिण भागात लघू पाटबंधारे विभागाचे वळण,कोल्हापूर,गाव तलाव,साठवण,पाझर अशा प्रकारचे बंधारे आहेत.त्यापैकी शहराच्या दक्षिण भागाकडील डोंगर माथ्यालगत असणारया गावाच्या हदीत अकरा तलाव आहेत.तलावाच्या माध्यमातून या परिसरातील शेतीला त्याचा लाभ मिळत होता.मात्र गेल्या काही वर्षात या परिसरात नागरिकरण मोठ्या प्रमाणात वाढून शेतजमिनी विकसित केल्या गेल्या आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात बांधकामे होऊन शेतजमीन कमी झाली आहे.शेतीसाठी म्हणून या परिसरात असलेल्या बंधा-यांच्या उपयोगाचे प्रमाण दिवसेदिवस कमी होऊ लागले आहे.असे चित्र शहराच्या दक्षिण भागात स्पष्ट दिसत आहे.

          या भागात असलेल्या या बंधा-याचे स्वरूप पाझर तलाव असल्याने बंधा-यातील पाणी पाझरून वाहून जाते.लहूपाटबंधारे खात्याच्या नियमानूसार नागरिकांना या तलावातून थेट पाणी घेता येत नाही. य़ेथील नागरिकरण वाढून काही काळाने परिसरातील शेतीही नाहीशी होत आहे.बंधा-याचे स्वरूप पाझर तलावाच्या स्वरूपाचेच राहल्याने त्यातील पाणी वाया जात आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन हे बंधारे आताच पक्क्या स्वरूपाचे केल्यास या गावांचा काही प्रमाणात का होईना पाणीप्रश्न मार्गी लागेल.सध्याही या गावांना पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.त्यासाठी बंधा-याचे पाणी टिकून ठेवण्याच्या दृष्ट्रीने त्यामध्ये बदल करण्याची गरज परिसरातून व्यक्त केली जात आहे.

पुणे शहराच्या दक्षिण भागातील काही गावे महापालिकेत समाविष्ट झाली आहेत.तर काही गावे आज ना उद्या पालिकेत समाविष्ट झाल्यास पालिकेच्या पाणी पुरवठयावर ताण वाढणारच आहे.ही सर्वच गावे डोंगर उताराच्या पायथ्याशी असल्याने दर वर्षी पावसाळयात ओढ्या-नाल्यांच्या माध्यमातून या गावाच्या ह्दीत असणा-या बंधा-यामध्ये मोठ्या प्रमाणात हजारो लिटर पाणी जमा होत असते.मात्र या तलावाचे स्वरूप पाझर तलावाचे असल्याने लवकरच हे तलाव कोरडे पडत असतात.त्यामुळे हिवाळय़ातच परिसरातील पाण्याचे स्तोत्र कमी पडून पाणी टंचाई जाणवत असते.उन्हाळ्याच्या काळात या सर्वच गावांच्या नागरिकांना पाण्याची टंचाई भासते.हे बंधारे पक्कया स्वरूपाचे करून त्याची उंची वाढविल्यास पाणीसाठा टिकून त्याचा नागरीकांना वापराच्या पाण्यासाठी, परिसरातील गावातील कुपनलिकेच्या पाण्याचे स्तोत्र वाढीसाठी,व विहीरीच्यास्तोत्र वाढीसाठी तरी चांगला उपयोग होईल. याशिवाय भविष्यात ही गावे पालिकेत गेल्यानंतर पालिकेकडून करण्यात येणा-या पाणी पुरवठ्याचा ताणही कमी होईल असे मत जाणकार नागरिकांनी व्यक्त केले आहे.

पाझर तलावांच्या परिसरातील शेती क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे.त्यासाठी या तलावांचे बांधकाम पक्के करून  सरंक्षण आणि संवर्धन केल्यास पाणी प्रश्नावर मात करता येईल.वडकी वडाचीवाडी येवलेवाडी उंड्री पिसोळी आंबेगाव निंबाळकर वाडी गुजरवाडी औतडवाडी हांडेवाडी येथे हे पाझर तलाव आहेत, यांचे संवर्धन झाल्यास पुणे महानगरपालिकेवर येणारा पाण्याचा त्रास कमी होऊन भविष्यात पाण्याची मोठी बचत होईल असे येथील जुने जाणकार आणि अभ्यासू लोकांचे म्हणणे आहे.

याबात आम्ही पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्याशी समपर्क केला असता तो झाला नाही.