निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हाधिकारी राम यांनी घेतला आढावा

715

मल्हार न्यूज ऑनलाईन

आगामी लोकसभा निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर निवडणूकविषयक कामकाजासाठी समन्‍वयक अधिकारी नेमण्‍यात आले असून प्रत्‍येकाने आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्‍या. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, उपजिल्‍हाधिकारी विजयसिंह देशमुख आदींसह इतर समन्‍वयक अधिकारी उपस्थित होते.                                                                                                                               प्रारंभी जिल्‍हाधिकारी राम यांनी लोकसभा निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर करण्‍यात येणा-या पूर्वतयारीचा आढावा घेतला. प्रत्‍येक समन्‍वयक अधिका-याने सोपविण्‍यात आलेली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी. प्रत्‍येक विभागाकडून मागविण्‍यात आलेली माहिती अचूक आणि वेळेवर देण्‍यात यावी. सर्व समन्‍वय अधिका-यांचे प्रशिक्षण घेण्‍यात येणार असून त्‍याबाबतचा आराखडा तयार करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी दिल्‍या. जिल्‍हा निवडणूक व्‍यवस्‍थापन आराखडा तयार करण्‍यात येत असून त्‍यानुसार सर्वांनी आपले कर्तव्‍य पार पाडावे,असेही त्‍यांनी सांगितले.                                                निवडणूक आयोगाचा जिल्‍ह्यात दौरा होणार असून त्‍याबाबत सर्व संबंधित अधिका-यांनी नियोजनासह तयार रहावे. अनेक अधिका-यांना यापूर्वीच्‍या निवडणुकविषयक कामाचा अनुभव आहे, ही चांगली गोष्‍ट आहे. तथापि, यावर अवलंबून न राहता निवडणूक आयोगाच्‍या मार्गदर्शक सुचनांचे अवलोकन करुन कार्यवाही करण्‍यात यावी, असेही जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले. बैठकीत निवडणूक खर्च व्‍यवस्‍थापन, एक खिडकी योजना, मतदार मदत केंद्र, तक्रार निवारण कक्ष,कायदा व सुव्‍यवस्‍था, निवडणूक प्रशिक्षण, वाहन अधिग्रहण  आदींचा आढावा घेण्‍यात आला.