कोंढव्यात पोटच्या तीन मुलींवर बलात्कार करणार्‍या नराधम बापाला जन्मठेप; 14 हजार रुपये दंडाची शिक्षा

1461
भूषण गरूड पुणे :-
    पती अत्याचार करत असल्याचे माहित झाल्यानंतरही पतीला पाठीशी घालणार्‍या मुलींच्या आईला सात वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची विशेष न्यायाधीश आर. व्ही.आदोने यांनी सुनावली आहे. बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आईला सुनाविन्यात आलेली ही पहिली शिक्षा आहे. 
         शिक्षा झालेले वडील (45), तर आई (40) वर्षाची आहे. हे कुटुंबिय कोंढवा भागात राहत असून, मूळचे उत्तरप्रदेशचे आहे. सण 2010 ते 22 एप्रिल 2015 या कालावधीत ही घटना घडली. वडिलांनी (22), (19) आणि (15) वर्षाच्या मुलींशी घरात कोणी नसल्याचे पाहून बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितले, तर बघून घेईन, अशा आशयाची धमकी दिली. तरीही पीडित तिन्ही मुलींनी याबाबत आईला सांगितले. त्यावेळी तुमच्या वडिलांवर कोणी तरी करणी केली आहे. त्यामुळे ते असे करतात. तुम्ही हा प्रकार कोणाला सांगू नका’ असे म्हणत आईने वडिलांना केलेल्या गुन्हाबद्दल पाठीशी घातले. मात्र, 15 वर्षीय मुलीने याबाबत ओळखीच्या महिलेला सांगितले. त्या महिलेच्या मुलाने घरात जावून आरोपीला याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने शिवीगाळ करून त्याला पाठवून दिले. घरातील गोष्टी बाहेर का सांगितल्या म्हणत 15 वर्षीय मुलीला मारहाण केली. त्यावेळी ती मुलगी रागाने त्या मावशीच्या घरी गेली. आई तेथून तिला घेऊन आली. त्यानंतर तिच्यासह जावून कोढवा पोलिस स्टेशनमध्ये याबाबत माहिती दिली. त्यानुसार महिला पोलिस उपनिरीक्षक शितल सुतार यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यांनीच या प्रकरणाचा तपास केला. त्यांना कोर्ट कॉन्स्टेबल अश्‍विनी पाटील यांनी सहय्‍य केले. पोलिसांनी पती आणि त्याला मदत केल्याप्रकरणात आईवर गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी 11 साक्षीदार तपासले. त्यामध्ये 15 वर्षीय मुलीची आणि माहिती दिलेल्या शेजारच्या महिलेची साक्ष आणि वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. 
         मुलींचा आई-वडिलांवर सर्वाधिक भरवसा असतो. त्यांना शिक्षण देणे. देशाचे आदर्श नागरिक बनविणे, हे आई-वडिलांचे कर्तव्य आहे. मात्र, इथे आई-वडिलांनी मुलींसोबत गैरकृत्य केले आहे. त्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसला आहे. पीडित 15 वर्षीय मुलीला तर या घटनेपासून बाहेर सामजिक संस्थेत राहावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर समाजात गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी हा गुन्हे करणार्‍या दोघांना अधिकाधिक शिक्षा देण्यात यावी, असा युक्तीवाद अ‍ॅड. लीना पाठक यांनी केला. 
     न्यायालयाने वडिलांना भारतीय दंड संहिता कलम 376 (2) (बलात्कार) नुसार जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंड, 506 (1) नुसार (धमकाविणे) 1 वर्षे सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंड, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 8 नुसार पाच वर्षे सक्तमजुरी आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. तर आईला 109 सह 376 (बलात्कार) गुन्हाची माहिती असतानाही लपवणे नुसार 7 वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडापैकी 12 हजार रुपये पीडित अल्पवयीन मुलाला देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.