पर्यटन वृद्धीचा ‘प्रबळगड पॅटर्न’

841

डॉ. मिलिंद दुसाने , रायगड                                          रायगड जिल्हा पर्यटनाचे उर्जावान केंद्र आहेच. पर्यटन वृद्धीच्या अनेक संधी या ठिकाणी आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासन विविध प्रयत्न करीत आहे. पर्यटन वृद्धी सोबत हे पर्यटन सुरक्षित व सुकर होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राबविलेल्या उपाययोजनांचे 8सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. सुरक्षित आणि सुकर पर्यटनाचा हा प्रयोग त्यांनी प्रबळगड येथे राबविला. त्याचे परिणाम आता समोर आले असून  आता हा सुरक्षित पर्यटनाचा ‘प्रबळगड पॅटर्न’ म्हणून समोर येत आहे.

प्रबळगड हे पनवेल तालुक्यातील साहसी पर्यटकांचे ‘हॉट डेस्टिनेशन’. या ठिकाणी ट्रेकिंग साठी जाणाऱ्या साहसी युवकांची संख्या खूप अधिक. अनेकदा पर्यटक दिशाभ्रमित होऊन हरवल्याच्या घटनाही पूर्वी घडल्या. नंतर प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने पर्यटकांना हुडकून सुरक्षित स्थळी आणावे लागल्याचे अनेक प्रसंगही सांगता येतील.

तथापि, हा धोका ओळखून जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सुरक्षित पर्यटनासाठी एक योजना तयार केली. त्यानुसार, प्रबळगड व अन्य अशाच साहसी पर्यटन केंद्रांवर आलेल्या ट्रेकर्सच्या ग्रुपने आपली नोंदणी करावी. तसेच सोबत एक स्थानिक रहिवाशांमधील एक  वाटाड्या (गाईड) सोबत न्यावा, ही सेवा प्रति ट्रेकर 50 रुपयांत उपलब्ध करुन देण्यात आली. ही जबाबदारी  प्रबळगड ज्या वनहद्दीत येतो त्या  माची प्रबळ येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे देण्यात आली. या समितीने गावातील माहितगार युवकांना गाईड म्हणुन प्रशिक्षित केले. त्यांना स्थानिक सर्व माहिती होतीच. ही माहिती पर्यटकांना समजावून सांगणे, याबाबत त्यांना प्रशिक्षित करण्यात आले. त्यामुळे स्थानिक युवकांचा कौशल्य विकास होऊन त्यांना स्थानिकपातळीवरच रोजगार उपलब्ध झाला.

संयुक्त वन व्यवस्थापन समितीने स्थानिक नागरिकांना  किल्ल्याची माहिती पर्यटकांना देणे, आपत्तीच्या प्रसंगी मदत बचाव कार्य राबविणे, प्रथमोपचार करणे यासारखी कौशल्ये शिकवली. शिवाय या समितीमार्फत किल्ल्याच्या मार्गांची डागडूजी, गिर्यारोहणासारख्या उपक्रमांसाठी सोयी सुविधांची निर्मिती, स्वच्छता, जागो जागी दिशादर्शक व माहिती दर्शक फलक लावणे यासारखी कामे करण्यात आली.

            आलेल्या पर्यटकांनी प्रति व्यक्ति 30 रुपये या प्रमाणे गाईड फी व प्रति व्यक्ती 20 रुपये या दराने प्रवेश फी आकारण्यात आली. त्यात पर्यटकांना वाहन पार्कींग आदी सुविधा पुरविण्यात आली. नोंदणीस्थळी प्लास्टीकच्या वस्तू, वेष्टणे आदी जमा करण्यात आल्या. पाण्यासाठी जंगलात ठिकठिकाणी वन विभागाच्या वतीने सोय करण्यात आली. हळू हळू या पद्धतीला पर्यटकांचा प्रतिसाद मिळू लागला. जुलै महिन्यात सुरु झालेल्या या उपक्रमामुळे एकट्या प्रबळगडावर आजतागायत 14 हजार 596 पर्यटक ट्रेकिंगसाठी येऊन गेले. त्यांनी भरलेल्या गाईड शुल्क आणि प्रवेश शुल्कातून संयुक्त वन व्यवस्थापन समितीला  2 लाख 91 हजार 920 रुपयांचे उत्पन्न मिळाले.

            केवळ आर्थिक उत्पन्न हीच या व्यवस्थेची फलनिष्पत्ती नसून त्यामुळे इतरही अनेक फायदे दृष्टीपथास आले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे प्रवेशाची नोंद करावयाची असल्याने व तेथे प्लास्टीक व अन्य आक्षेपार्ह वस्तूंची तपासणी होत असल्याने गडावर व जंगलात मद्यपान आदी  गैरप्रकारांना आपोआप आळा बसला.  जंगलात प्लास्टीक वस्तू जाण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले, स्थानिक रहिवाशांना रोजगार मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गेल्या जुलैपासून आज तागायत एकही दुर्घटना घडली नाही. त्यात दुखापतही झाली नाही.

            जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व वन विभागाने संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून केलेल्या या अंमलबजावणीमुळे आता सुरक्षित पर्यटनाचा प्रबळगड पॅटर्न विकसीत झाला आहे.                          यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, जिल्हाधिकारी म्हणून या व अशा अन्य ठिकाणी  स्थानिक रहिवाशांमधूनच गाईड तयार करण्यात आले. पर्यटकांना गाईड सोबत असल्याशिवाय  किल्ल्यावर जाण्यास मनाई केली. तेथे मद्य आदी वस्तू नेण्यास व सेवन मनाईची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे पर्यटकांना अधिक सुरक्षितता वाटली आणि त्यातून संयुक्त वन व्यवस्थापन समितीलाही उत्पन्न मिळाले, स्थानिक लोकांना रोजगार मिळाला.