गुणवत्तेच्या आधारेच विद्यापीठांना स्वायत्तता : प्रकाश जावडेकर

709
अनिल चौधरी, पुणे 
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या २० व्या पदवीप्रदान समारंभात जैन आचार्य विद्यासागरजी यांना डी. लिट. प्रदान 
 जगाच्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर गुणवत्ता हाच एकमेव निकष आहे. इथून पुढच्या काळात गुवत्तेच्या आधारेच विद्यापीठांना स्वायत्तता मिळेल असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या २० व्या पदवीप्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या पदवीप्रदान समारंभात संत शिरोमणी जैन आचार्य श्री. १०८ विद्यासागरजी महामुनीराज यांना भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाची डी. लिट. ही मानद पदवी कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू प्रा.डॉ. माणिकराव साळुंखे, प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. विश्वास  धापते सर्व विद्या शाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन आणि विद्या परिषदेचे सदस्य उपस्थित होते. या समारंभात ६१२० विद्यार्थ्यांना पदवी, ५८ विद्यार्थ्यांना पी.एचडी. आणि ४४ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रमुख पाहुणे, कुलपती आणि कुलगुरू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. 
L
जावडेकर म्हणाले, भारताला समृद्ध अशी शैक्षणिक परंपरा लाभली आहे. पूर्वी इथल्या नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठात जगभरातले विध्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत. याची आठवण आजच्या विद्यापीठांनी ठेवली पाहिजे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबरच गुणवत्ता वाढीसाठी केंद्रसरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. पूर्वी ४८ हजार कोटी रुपये असलेला हा निधी सव्वालाख कोटीपर्यंत वाढविला आहे. शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजऋण फेडण्यासाठी आणि राष्ट्राला उन्नत करण्यासाठी केला पाहिजे. काळाची पावले ओळखून अभ्यासक्रम सतत अद्ययावत केले पाहिजेत. बदल स्वीकारण्याची मानसिकता शिक्षण क्षेत्रात असली पाहिजे. आज डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून १ लाख ८० हजार ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. 
कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी विद्यार्थ्यांना ध्येय आणि मूल्यांप्रती अढळ राहण्याचा संदेश दिला. 
        कुलगुरू प्रा.डॉ. माणिकराव साळुंखे विद्यापीठाचा अहवाल सादर करताना म्हणाले, संशोधन हा विद्यापीठाचा आत्मा आहे. अशी भावना ठेवून या विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण संशोधन केले तसेच स्पर्धेचे आणि काळाचे भान ठेवून सतत अद्ययावत राहण्याचा केलेला प्रयत्न, त्यामुळे देशातल्या नामवंत विश्वविद्यालयांमध्ये भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा समावेश होतो. प्रा. राजेंद्र उत्तूरकर आणि डॉ. ज्योती मंडलिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.