अक्शनपॅक्ड ‘रॉकी’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित

754

अनिल चौधरी, पुणे

‘अग्नी, कर्ज, रोग आणि शत्रू या चार गोष्टी वेळीच नष्ट नाही केल्या तर त्या पुन्हा उद्भवतात.’ स्वतःच्या अस्तित्वावर, कुटुंबावर आणि प्रेमावर घाला घालायला टपून बसलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करणारा डॅशिंग रॉकी लवकरच मराठी चित्रपट ‘रॉकी’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पेपरडॉल एनटरटेन्मेंट प्रस्तुत आणि सेवेन सीज् व ड्रीम् विव्हर प्रोडक्शन्स निर्मित ‘रॉकी’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक ‘अहमद खान’ यांच्या हस्ते नुकताच प्रदर्शित झाला. ‘रॉकी’च्या निमित्ताने पहिल्यांदाच एक जबरदस्त अॅक्शनपट मराठी चित्रपटसृष्टीत निर्माण झाला आहे. 

‘रॉकी’चे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर दिसणारा पिळदार शरीरयष्टीचा तो तरुण नेमका कोण आहे? याची चर्चा सिनेवर्तुळात रंगली होती. त्या उत्तराची प्रतीक्षाही या ट्रेलरमुळे संपली आहे. ‘संदीप साळवे’ हा रांगडा तरीही देखणा चेहरा ‘रॉकी’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रॉकीच्या माध्यमातून मी कथानायकाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पदार्पणातच असा अॅक्शनने भरलेला चित्रपट मिळाल्यामुळे माझे पदार्पण दमदार होणार आहे यापेक्षा दुसरी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट माझ्यासाठी नाही’ असा आनंद ‘संदीप साळवे’ यांनी व्यक्त केला. ‘अॅक्शन, इमोशन, ड्रामा आणि रोमान्स या सगळ्याचे परिपूर्ण पॅकेज असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल’ असा विश्वास हिंदीतले सुप्रसिद्ध नट ‘राहुल देव’ यांनी व्यक्त केला. बागी-२ चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक ‘अदनान ए. शेख’ यांनी ‘रॉकी’ च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शन केले असून ‘एका उत्कृष्ट कलाकृतीचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आपल्या कुटुंबासाठी आणि प्रेमासाठी संघर्ष करणाऱ्या बेधडक युवकाची कथा ‘रॉकी’ चित्रपटात बघायला मिळणार आहे.

या सिनेमातून संदीप साळवे व अक्षया हिंदळकर हे फ्रेश चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. या नव्या जोडीसोबत अशोक शिंदे, प्रदीप वेलणकर, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत या कलाकारांच्या भूमिका आहेत. हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते राहुल देव यांनी एका जोरदार भूमिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठीत काम केले आहे.                          या चित्रपटाचे निर्माते प्रशांत त्रिपाठीमनेश देसाईनितीन शिलकरहिमांशू अशर असून दिग्दर्शन अदनान ए. शेख यांचे आहे. चित्रपटाचे कथालेखन अदनान ए. शेख व विहार घाग यांनी केलं असून संवाद आदित्य हळबे यांचे आहेत. पटकथा अदनान ए. शेख यांची आहे. छायांकन फारुख खान यांनी केले आहे. राहुल राऊत, मंदार चोळकर, जय अत्रे, सचिन पथक, संदीप पाटील यांनी चित्रपटाची गीतं लिहिली असून समीर साप्तीस्कर, वासीम सदानी यांचे संगीत गीतांना लाभले आहे. आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, जावेद अली, पलक मुच्चल, गीत सागर, ज्योतिका टांगरी या हिंदी मराठी सिनेसृष्टीतल्या नामवंत गायकांनी गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. सुनिता त्रिपाठी या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत.

अॅक्शनपॅक्ड ‘रॉकी’ ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.