रायगडमध्ये बाँब सदृश्य वस्तू आढळून आल्याने खळबळ

1081

गिरीश भोपी:-
रात्री कर्जत वरून आपट्याला येणारी बस आपटे बस डेपोमध्ये थांबली असताना कंडक्टरला एका पिशवीत काही तरी टाईम बाँब सारखे असल्याचे आढळून आले. या बाबत त्यांनी स्थानिक पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब बाँब शोधक पथकाला कळवले.
रात्री बारा वाजण्याच्या सुमारास रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्यासह अलिबाग वरून बाँब शोधक पथक घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत लोकांना याची माहिती मिळाली असल्याने सर्वांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी सर्वांना बस पासूनच दूर केले होते. आलेल्या बाँब शोधक पथकाने पाहणी केली असता ती वस्तू खरोखरच बाँब असल्याचे आढळून आले. रात्री उशिरापर्यंत बाँब निकामी करण्याचे काम सुरू झाले. शेवटी रात्री साडेतीनच्या सुमारास यशस्वीरीत्या बाँब निकामी केले गेले आणि त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
काही दिवसांपूर्वीच पुलवामा येथील दहशतवादी हल्ला झाला होता ज्यामध्ये ४४ भारतीय जवान शहीद झाले. अशातच ही घटना म्हणजे दहशतवाद्यांनी अनुचित प्रकार घडून आणण्यासाठी केलेले प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. सुदैवाने वेळीच याबाबत माहिती मिळाली आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा फार मोठे संकट उभे राहिले असते. पोलिसांनी याबाबत नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून कोणतीही बेवारस वस्तू आढळून आल्यास हात न लावता त्याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन केले आहे.