दिवसाढवळ्या बँकेतून 28 लाख लंपास

873
भूषण गरूड पुणे.
गजबज असणार्‍या शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्ह्ज चौकात असणार्‍या एसबीआय (भारतीय स्टेट बँक) शाखेत घोळक्याने आलेल्या चोरट्यांनी कर्मचार्‍यांचे लक्ष विचलित करून तबल 28 लाखांची रोकड असणारी लोखंडी पेटीच नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्हीत चोरी कैद झाली असून, काही वेळातच रिकामी पेटी टिळक रस्ता परिसरात मिळून आली आहे. दरम्यान, चोरटे परराज्यातील असल्याचे सांगण्यात येते.
याप्रकरणी बँकेच्या कर्मचारी वर्तिका प्रांशु श्रीवास्तव (वय 35) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बारा ते चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेव्हन लव्ह्ज चौकात एसबीआयची शाखा आहे. गुरुवारी दिवसभर जमा झालेली28 लाख 8 हजारांची रोकड एका पेटीत ठेवली होती. ही पेटी कॅशियरच्या काऊंटरचे पाठीमागील बाजूला ठेवण्यात आली होती. सकाळी बँक उघडल्यानंतर नेहमीप्रमाणे ग्राहकांची गर्दी झाली. याच वेळी बँक  कामानिमित्तच्या बहाण्याने बारा ते चौदाजण आत शिरले. त्यांनी कर्मचार्‍यांना बोलण्यात गुंतवून त्यांचे लक्ष विचलित केले. त्यातील एकाने  ही पेटी उचलली आणि थेट बाहेर पडला. त्याच्यापाठोपाठ आत शिरलेले सर्वचजण बाहेर पडून पसार झाले. पैशांची पेटी जागेवर नसल्याचे काही वेळातच कर्मचार्‍यांच्या लक्षात आले. यानंतर एकच धांदल उडाली. तत्काळ पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. खडक पोलिस तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. दरम्यान, बँकेच्या सीसीटीव्हीत ही सर्व घटना कैद झाली आहे. चोरटे आत शिरताना तसेच पेटी उचलून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यानुसार, पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. ही चोरी नियोजनबद्ध केल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहेत. टोळी परराज्यातील असून, दोघे स्वारगेटच्या दिशेने गेल्याचे दिसत आहे. त्यानुसार, त्यांचा माग काढला जात आहे.
दरम्यान, काही वेळाने चोरट्यांनी रोकडसह पळविलेली लोखंडी पेटी टिळक रस्त्यावरील फुटपाथवर रिकामी सापडली आहे. बँकेतून बाहेर पडताच चोरटे वेगवेगळे होऊन पसार झाले आहेत. गुन्हे शाखेची पथके व खडक पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.
अशी नेली पेटी
प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर समोरच काऊंटर आहे. तीन ते चार कर्मचारी एका लाईनीत बसतात. कर्मचार्‍यांना पाठीमागून जाता-येता यावे यासाठी दोन काऊंटरमध्ये जागा ठेवून दुसरे एक कर्मचारी बसतात. काऊंटरच्या शेवटच्या ठिकाणी ही पेटी ठेवली होती. दोघेजण काऊंटरशेजारी उभे राहिले. यातील एकजण दोन कर्मचार्‍यांच्या पाठीमागून गेला. तसेच, ठेवलेली पेटी उचलून थेट बाहेर पडल्याचे दिसत आहे. दरम्यान, सीसीटीव्हीत चोरट्यांची पद्धत पाहून पोलिस अवाक झाले.