अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी

821

गिरीश भोपी, पनवेल 

सिडको प्रशासनामार्फत कामोठे विभागातील मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. परंतु याच मुख्य रस्त्यांना जोडणारे अंतर्गत रस्ते किंवा जोड रस्ते मात्र दुर्लक्षित राहिले आहेत.त्यामुळे येथील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी कामोठे येथील सामाजिक कार्यकर्ते बबनराव वसंतराव पवार यांनी सीडकोचे कार्यकारी अभियंता जे बी निर्मळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते बबनराव पवार म्हणाले, एकीकडे मुख्य  रस्त्यांच्या दुरूस्तीने वेग घेतला असून अंतर्गत व जोड रस्ते मात्र दुर्लक्षित राहिले आहेत. कामोठे शहरात बऱ्याच ठिकाणी जोडरस्त्यांवर खड्डे पडलेले असून, पदपथ देखील तुटलेल्या अवस्थेत आहेत. रस्त्यांवरचे निघालेले डांबर, खचलेल्या साईडपट्ट्या यामुळे जोडरस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे लहान सहान अपघातास निमंत्रण ठरत आहेत. मुख्य रस्त्यांच्या धर्तीवरच अंतर्गत व जोड रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होऊ लागली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश शाळेपासून ते जवाहर औद्योगिक वसाहतीपर्यंत जोडरस्त्याची खूप दुरवस्था झाली असून तात्काळ दुरुस्तीची आवश्यकता आहे.ही दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, अन्यथा मोठ्या जनांदोलनाचा सामना सिडकोला करावा लागेल.