पुण्यात सुरु असलेले मूकबधिर तरुणांचे उपोषण अखेर मागे

1245

मल्हार न्यूज प्रतिनिधी :

मूकबधिर तरुणांचे आपल्या विविध मागण्यांसाठी पुण्यातल्या समाजकल्याण आयुक्तालयावर सुरु असलेले ठिय्या उपोषण आज ३१ तासानंतर अखेर मागे घेण्यात आले. राज्य शासनाने  त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. सामजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलेली शिष्टाई यशस्वी झाली असून आंदोलनकर्त्यांना कांबळे यांच्या हस्ते ज्यूस पाजून हे उपोषण मूकबधिर तरुणांनी मागे घेतले.

    या आंदोलनादरम्यान मूकबधिर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात होता. दरम्यान, गेल्या २३ तासांपासून मूकबधिर तरुण उपाशीपोटी आंदोलन करीत होते. सरकारने आता चर्चा न करता थेट जीआरच काढावा असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता.

सरकारवर सर्व स्तरातून टीका होत असताना मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. पण या दरम्यान, मूकबधिर तरुणांशी सांकेतिक भाषेत बोलण्यासाठी कोणी नसल्याने संवाद साधला गेला नाही. मात्र, त्यानंतर ही चर्चा यशस्वी पार पडली आणि या तरुणांच्या मागण्या मान्य करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.    दरम्यान बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी दुपारी उशिरा घटनास्थळी भेट देऊन पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध व्यक्त केला. त्यांनी एका मोर्चा द्वारे तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला.