भीक मागण्यासाठी अपहरण केलेल्या तीन वर्षाच्या मुलाची सुटका; कोंढवा पोलिसांची कामगीरी

936

भूषण गरूड पुणे.
भीक मागण्यासाठी अपहरण केलेल्या तीन वर्षांच्या मुलाची कोंढवा पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. याप्रकरणी एका महिलेसह पुरुषाला बेड्या ठोकल्या आहेत. 
लाला शिवाजी सूर्यवंशी (वय 38, रा. इंदिरा वसाहत, औंध, मूळ नंदगाव, उस्मानाबाद) व सुनीता लक्ष्मण बिनावत (वय 30, रा. सदर, मूळ कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी मुलाचे वडील गोविंद पांडुरंग आडे (वय 26, रा. आईमाता मंदिराशेजारी, शालिमार सोसायटीजवळ, कोंढवा) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
दि. 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा मुलगा आपल्या आईसोबत घराशेजारील  परिसरात चुलीसाठी लाकडे गोळा करण्यासाठी गेला  होता. मुलाला रस्त्यावर उभे करून आई लाकडे गोळा करत पुढे गेली. मात्र जेव्हा आई परत आली तेव्हा मुलगा जागेवर दिसला नाही. त्यानंतर परिसरात खूप शोध घेतल्यानंतरदेखील मुलगा मिळून आला नसल्यामुळे त्यांनी  पोलिसांत धाव घेतली. मुलाच्या घरची परिस्थिती पाहता पैशासाठी किंवा अन्य कोणत्या कारणासाठी  मुलाचे अपहरण करण्यात आल्याची शक्यता कमी होती. त्यामुळे प्राथमिक निष्कर्षावर  मुलाचे अपहरण भीक मागण्यासाठी झाले असावे, असा अंदाज करत तपासाला सुरुवात केली. 
यावेळी पोलिसांनी शहराच्या विविध भागातील तब्बल 110 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची पाहणी केली. तेव्हा एका ठिकाणी एक महिला व पुरुष एका लहान मुलाला घेऊन जात असल्याचे दिसले. पोलिस आरोपीची माहिती गोळा करत सासवडपर्यंत पोचले. त्या ठिकाणी गेल्यानंतर संशयित आरोपी पुरंदर तालुक्यातील वीर गावी गेल्याचे समजले. पोलिस रातोरात वीर गावात दाखल झाले. गावात श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा सुरू होती. कोंढवा पोलिसांनी ग्रामीण पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सदर आरोपींना ताब्यात घेऊन अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका केली. यावेळी आरोपींनी भीक मागण्याच्या हेतूने मुलाचे अपहरण केल्याचे सांगितले. 
सदरची कामगिरी पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक आयुक्त मिलिंद पाटील, वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील, गुन्हे निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेतन मोरे, नितीन बोधे, उपनिरीक्षक संतोष शिंदे, कर्मचारी राजस शेख, इकबाल शेख, सुशील धिवार, योगेश कुंभार, संजीव कळंबे, जयंत चव्हाण यांच्या पथकाने केली.