पासपोर्ट अर्जा मध्ये खोटी किवां चुकीची माहिती भरल्यास पाच हजार रूपयाचा दंड

874

भूषण गरूड पुणे.

पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्ज करीत आहात, तर लक्षपूर्वक अर्ज भरा. कारण खोटी किंवा चुकीची माहिती अर्जामध्ये भरल्यास पासपोर्ट विभाग अर्जदाराकडून पाच हजार रुपयांचा दंड आकारतो आहे. अर्जदारांच्या या चुकांमुळे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाने मागील वर्षी दंडाच्या स्वरूपामध्ये तब्बल 1 कोटी 75 लाख रुपयांची रक्‍कम आकारली आहे.
नियमित पासपोर्ट, डिप्लोमेटिक पासपोर्ट, शासकीय पासपोर्ट या विविध प्रकारच्या पासपोर्टसाठी अर्जदार अर्ज करीत असतात. सामान्य नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी नियमित पासपोर्टचा अर्ज भरावा लागतो. 2018 मध्ये 21 हजार 501 अर्ज विविध त्रुटींमुळे बाद झाले. यातून क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाने सामान्य अर्जदारांच्या खिशातून सुमारे 1 कोटी 75 लाख रुपयांची रक्‍कम दंडाच्या स्वरूपामध्ये वसूल केली.
कामकाजाच्या दिवशी 40 ते 45 हजार रुपयांची रक्‍कम या दंडाच्या स्वरूपामध्ये पासपोर्ट विभागाला प्राप्त होत आहे. तर, महिन्याला 8 ते 25 लाख रुपयांपर्यंतची रक्‍कम प्राप्त होते. त्यामुळे नागरिकांनी दक्षतेने पासपोर्ट अर्ज भरणे गरजेचे आहे. 
पासपोर्ट विभागातर्फे केवळ शंभर रुपयांच्या बदल्यामध्ये पासपोर्ट अर्ज भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी पासपोर्ट सेवा केंद्रा (कॉमन सर्व्हिस सेंटर)ची सोय विभागाच्या वेबसाइटमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे.