खराडीच्या मदरहूड हॉस्पिटलतर्फे आयोजित लिट्ल थिंग्ज अबाउट प्रेग्नन्सी या कार्यशाळेत १००हून अधिक जोडप्यांचा सहभाग

618

अनिल चौधरी,पुणे

खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलने महिला दिनाच्या निमित्ताने गरोदर स्त्रियांसाठी “लिट्ल थिंग्ज अबाउट प्रेग्नन्सी” या पालकत्वाविषयीच्या मोफत सत्राचे आयोजन केले होते. लिट्ल थिंग्ज अबाउट प्रेग्नन्सी हा मदरहूड हॉस्पिटलने आयोजित केलेला आई-वडील होऊ घातलेल्या जोडप्यांसाठीचा पुण्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. कन्सल्टंट स्त्रीरोग व प्रसुतीतज्ज्ञ- डॉ. राजेश्वरी पवार, डॉ. मोहिता गोयल, डॉ. स्वाती गायकवाड; ज्येष्ठ नवजातअर्भक व बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारीख, आहारतज्ज्ञ- डॉ. प्रीती त्यागी, ज्येष्ठ फिजिओथेरपिस्ट डॉ. कृतिका बोलिया, मनोविकारतज्ज्ञ डॉ. रुथ फर्नांडिस यांनी गरोदरपणा, बाळाचा जन्म, पालकत्व व होऊ घातलेले पालक या विषयांच्या विविध अंगांवर चर्चा केली.

या कार्यक्रमात, होऊ घातलेल्या आई-बाबांसाठी खास पॅम्परिंग स्टेशन्स, अनेक मौजमजेचे उपक्रम होते. गरोदर स्त्रियांना मातृत्वापर्यंतच्या प्रवासात मार्गदर्शन करण्यासाठी आहारतज्ज्ञ आणि बाल शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून होऊ घातलेल्या मातांना मार्गदर्शन प्राप्त करण्याची आणि शंकांचे निरसन करून घेण्याची संधी मिळाली. आहार, तंदुरुस्ती, श्रमाचे व्यवस्थापन आणि मॅटर्निटी फॅशन या विषयांमधील तज्ज्ञांचा सल्ला व्यक्तिगत स्तरावर मिळाला.

खराडीच्या मदरहूड हॉस्पिटलसमधील फॅसिलिटी संचालक डॉ. कृष्णा मेहता म्हणतात, “गरोदरपण हा कोणत्याही जोडप्याच्या प्रवासातील एक विशेष टप्पा असतो. आपल्या मागील पिढ्यांच्या तुलनेत मुलाला जन्म देण्याच्या प्रक्रियेत आता खूप बदल झाला आहे. विशेषत: प्रथमच आई-बाबा होणाऱ्यांमध्ये माहितीचा खूप गोंधळ असतो, सर्व बाजूंनी सल्ले येऊन आदळत असतात. या काळात अनेक प्रश्न पडतात, चिंता सतावतात, ताण जाणवतो. पुणे शहरात मदरहूडने प्रथमच अशा प्रकारे पुढाकार घेऊन शास्त्रशुद्ध स्वरूपातील माहितीचा प्रसार करणारा उपक्रम आयोजित केला आहे. त्याचबरोबर गरोदरपणाच्या आनंदी कालखंडात सतावणारी मनातील भीती-काळजी तज्ज्ञांशी चर्चा करून दूर करण्याची संधी तरुण जोडप्यांना मिळाली आहे.”

“शिवाय मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या स्वरूपात अवघे जग स्त्रीत्व साजरे करते. आमच्या आई होऊ घातलेल्या सुंदर स्त्रियांसाठी हा उपक्रम आयोजित करण्यासाठी याहून चांगली वेळ आणखी कोणती नसेल असे आम्हाला वाटले,” असे डॉ. मेहता म्हणाल्या.