अनिल चौधरी, पुणे:-
आपल्या कुटूंबासमवेत अमेरिकेत स्थायिक असलेल्या अभिनेत्री अश्विनी भावे सध्या मुंबईत आल्या आहेत. ब-याच काळानंतर महिला दिनाच्याच आठवड्यात मुंबईत असलेल्या अश्विनी भावेंनी आगळ्या पध्दतीने आंततराष्ट्रीय महिला दिन सेलिब्रेट केला.
समाजसेवेत नेहमीच रस असलेल्या आणि दरवर्षी समाजसेवेत पुढाकार घेऊन काही धनराशी समाजाला अर्पित करणा-या अश्विनी भावेंनी नुकतीच रायगडमधल्या जांभूळपाडा गावाला भेट दिली. जांभूळपाड्यातल्या गरीब आणि गरजू महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे म्हणून शिलाई मशीन्स गिफ्ट केली.
ह्याविषयी विचारल्यावर अश्विनी भावे म्हणतात, “जांभूळपाड्यात काम करणा-या ‘सुधागड हितवर्धिनी सभा’ ह्या संस्थेशी मी गेली दोन वर्ष निगडीत आहे. यंदा मी महिला दिनाच्या वेळी योगायोगाने मुंबईत होते. म्हणूनच जांभूळपाड्यात स्वत: जाऊन तिथल्या महिलांसोबत वेळ घालवावा असं मला वाटलं. आणि तिथल्या महिलांनी स्वत:च्या पायावर उभं राहावं म्हणून मी त्यांना शिलाई मशीन भेट म्हणून दिली आहेत.”
अश्विनी भावे पर्यावरण रक्षणासाठीही नेहमी पुढाकार घेताना दिसतात. गेल्या वर्षी महिला दिनी त्यांनी मराठी सिनेसृष्टीतल्या 15 अभिनेत्रींना रोपं भेट म्हणून दिली होती. तर यंदा त्यांनी मराठी सिनेसृष्टीतल्या 10 पुरूष कलावंताना रोपं भेट दिली. त्यासोबतच हस्तलिखीत पत्रही पाठवलं.
अश्विनी भावेंनी ह्या पत्रात लिहीले आहे, “एका स्त्रीने एका पुरूषाला महिला दिनाच्या शुभेच्छा देणे ही थोडी चाकोरी बाहेरची गोष्ट आहे पण त्यातच धमाल आहे ना.. यावेळी काहीतरी वेगळं करावं असं वाटलं म्हणून ही आठवण भेट दिली. हे रोपटे तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या स्त्रीला द्या”