जिल्‍हाधिकारी राम यांची विविध कक्षांना भेट

741

अनिल चौधरी,पुणे,

लोकसभा निवडणुकीसाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्या विविध कक्षांना जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी आज भेट देऊन पहाणी केली. यावेळी निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, तहसिलदार विकास भालेराव, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीचे काम सुरळीत पार पाडण्‍यासाठी तसेच मतदारांच्‍या सुविधेसाठी विविध कक्ष स्‍थापन करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहेत. त्‍यानुसार जिल्‍हाधिकारी राम यांनी मतदार मदत केंद्र, तक्रार निवारण कक्ष, जिल्‍हा नियंत्रण कक्ष, मतदार जागृती कक्ष (स्‍वीप), इव्‍हीएम व्‍यवस्‍थापन याबाबत पहाणी केली.निवडणूक विषयक प्रमुख घडामोडींची माहिती सर्वसामान्‍य नागरिकांपर्यंत पोहोचण्‍यासाठी विविध माध्‍यमांचा वापर करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी दिल्‍या. त्‍यासाठी डिजीटल बोर्ड, बॅनर तयार करण्‍यात यावेत, असेही त्‍यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्‍यात आले असून त्‍यावर योग्‍य ते निर्णय घेण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी राम यांनी दिले. विहीत मुदतीत प्राप्‍त झालेले सर्व पात्र अर्ज मंजूर करण्‍यात येतील, असे बैठकीत सांगण्‍यात आले. लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हाधिकारी राम हे मतदार संघ निहाय दौरा करणार आहेत. दौ-यात झोनल ऑफीसर्ससह इतर अधिका-यांची बैठक घेऊन निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत. यामध्‍ये कायदा व सुव्‍यवस्‍था, मतदान केंद्रे, तेथील सुविधा, संवेदनशील मतदान केंद्रे, आदर्श आचार संहिता, खर्च नियंत्रण कक्ष, मतदान यंत्रांच्‍या सुरक्षितेसाठी केलेल्‍या उपाययोजना, उपलब्‍ध कर्मचारी वर्ग या विषयांचा समावेश असेल.