अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांस 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

1143

गिरीष भोपी,

तळोजा : पनवेलमधील पेणधर येथे राहणाऱ्या (मुळच्या उत्तर प्रदेश येथील कुटुंब)अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपी विनोद बुद्धू सहाणी या नराधमास अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षे सश्रम करावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यातील पिडीत मुलगी ही फक्त ६ वर्षाची आहे. आरोपी विनोद बुद्धू सहानी हा मुळचा नेपाळ आणि बिहार या सीमाभागात राहणारा असून पिडीत मुलीचे कुटुंब उत्तर प्रदेशातील येथील आहे. पेणधर येथील गुरुनाथ पाटील यांच्या चाळीत दोघांचे कुटुंब एकमेकांच्या शेजारी राहत असत.
मागच्या वर्षी १ मार्च २०१८ रोजी दुपारी २ वाजता आरोपी विनोद बुद्धू सहाणी यातील पिडीत मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले आणि खोलीत नेऊन बलात्कार केला. आरोपी विरोधात पिडीतेच्या आईने भादंवि कलम ३७६ (२) (आय) तसेच पोक्सो कायदा कलम ३, ४, ५, ६ नुसार तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन दोषारोपपत्र अलिबाग सत्र न्यायालयात दाखल केले. न्यायमूर्ती श्रीमती व्ही. एम. मोहिते यांच्या न्यायालयात झालेल्या या केसमध्ये सरकार पक्षातर्फे शासकीय अभियोक्ता अॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी एकूण ६ साक्षीदारांची साक्ष नोंदविली.
न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी विनोद बुद्धू सहाणी यास भा.दं.वि.कलम ३७६ (२) (आय) तसेच पोक्सो कायदा कलम ४, ६ खाली दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व तीन हजार रुपये दंड तसेच भादंवि कलम ३६३ खाली दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
या केसमध्ये पिडीत मुलीची तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश गीत्ते यांची साक्ष महत्वाची ठरली. याशिवाय पोलीस नाईक भालेराव व पोलीस शिपाई श्रीमती सायगावकर यांचे सहकार्य मोलाचे ठरले. खटल्याच्या निकालाकडे पेणधर गाव परिसरातील तसेच पनवेल येथील नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. पोलिसांनी वेळेत आणि लवकर तपास केल्यामुळे आरोपीला शिक्षा झाली.