” प्रीतम” एक हळवी प्रेम कथा 

1264
मल्हार न्यूज,पुणे
जन्मताच निसर्ग सौंदर्याचे लेणे लेवून आलेला प्रदेश म्हणजे कोकण. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटामधून कोकणाची निसर्गरम्य भूमी रुपेरी पडद्यावर दिसली. वाटा – आडवाटांवरचे, विस्तीर्ण व मनाचा ठाव घेणारे सागर किनारे, कौलारू घर, इतिहास – संस्कृतीचा दुमिर्ळ खजिना असं सर्व वैभव असणाऱ्या या मनोहारी लोकेशन ची भुरळ निर्मात्यांना व दिग्दर्शकांना पडली नसती तर नवल ! आगामी ” प्रीतम” या मराठी चित्रपटाची कथा कोकणच्या निसर्ग रम्य भूमीत घडणारी आहे. आणि त्या जोडीला एक हळवी प्रेम कथा या निसर्ग सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर खुलणार आहे. कोकणसारखा निसर्गाचा वरदहस्त केरळ ला सुद्धा लाभला आहे. कोकण आणि केरळ चा एक अनोखा संगम या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे.  केरळ मधील प्रसिद्ध “विझार्ड प्रोडक्शन”  च्या माध्यमातून “प्रीतम” या पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती होत असून मल्ल्याळम दिग्दर्शक सिजो रॉकी या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. 
                 कोकण च्या याच चिपळूण, कणकवली, कुडाळ या सारख्या नयनरम्य परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेढेकर हि फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या सोबत उपेंद्र लिमये, शिवराज वाळवेकर, आनंदा कारेकर, अस्मिता खटखटे, आभा वेलणकर, समीर खांडेकर,विश्वजित  पालव, अजित देवळे,कृतिका या कलाकारांच्या भूमिका आहेत.    
                 एक सुंदर प्रेम कथा “प्रीतम” च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसमोर येणार आहे.”प्रीतम ” या चित्रपटाच्या माध्यमातून कोकणचे सौंदर्य प्रेक्षकांना अनुभवता येणार असून या लोकेशन व प्रेमकथेविषयी बोलताना दिग्दर्शक सिजो रॉकी सांगतात कि, सगळ्यांना प्रेमात पाडणाऱ्या लोकेशंची आवश्यकता होती आणि त्यासाठी आम्हांला कोकणा शिवाय दुसरा पर्यायच न्हवता. एक नितांत सुदर आणि मनाला मस्त फील देणारा अनुभव “प्रीतम” चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळेल असा विश्वास ते व्यक्त करतात. 
              चित्रपटाची निर्मिती फैझल, निथीन सिजो करीत आहेत. चित्रपटाची  संहिता  सुजित कुरूप, पटकथा संवाद गणेश पंडित यांचे असून चित्रपटाची गीते गुरु ठाकूर यांनी लिहली आहेत. कला दिग्दर्शन संदीप रावडे करीत असून कास्टिंग डायरेक्टर आणि वेशभूषा चैत्राली डोंगरे करीत आहेत तर संकलन जयंत जठार करणार आहेत. छायांकन ओम प्रकाश , नृत्य दिग्दर्शन सुजित कुमार, तर संगीत विश्वजिथ यांचे आहे. जय कुमार नायर, रफिक टी. एम.चैत्राली डोंगरे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.