मुंबई विधी विद्यार्थ्यांचे तक्रारींचे त्वरित निरासन करू: कुलगुरू

1218

गिरीश भोपी,पनवेल

आज दिनांक २९/०३/२०१९ रोजी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर ह्यांनी महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिएशनला चर्चेसाठी निमंत्रित केले होते त्यासाठी मसलाचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे व त्यांचे सहकारी गुरुनाथ सटाले,ऍड.इंताज शेख, निलावती होलमुखे, सुनील देवरे,दर्शन पावसकर, मिलिंद गाडे,अनिरुद्ध मोरे,दिलीप सिंग आणि ऍड. मालिनी राय यांची उपस्थिती होती ,दिनांक १३/०३/२०१९ रोजी मसलाच्या वतीने विधी विभागाचे रखडलेले निकाल तसेच अन्य मागण्या पूर्ण करण्याकरिता “परिक्षा भवन विकणे आहे” आंदोलन करण्यात आले होते. आमच्या आंदोलनलाची गंभीर दखल घेऊन लेखी आश्वासनाच्या अंतर्गत पहिली मागणी LLB आणि LLM चे रखडलेले सर्व निकाल विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले तसेच उर्वरित मागण्यां संदर्भात आज कुलगुरुसोबत सकारात्मक चर्चा झाली व त्यावर जातीने लक्ष केंद्रीत करुन ते तात्काळ सोडविण्याची हमी कुलगुरूंनी दिली.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले काही महाविद्यालयांनी मनमानीपणा सुरु केला असून विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे याबाबत मसलाच्या वतीने कुलगुरूंकडे रीतसर तक्रार करण्यात आलेली आहे, विद्यार्थ्यांकडून पुनर्मूल्यांकन व फोटोकॉपीसाठी अधिक शुल्क आकारले जात आहे आणि फोटोकॉपी देण्यास काही महाविद्यालय नकार देत आहेत. काही महाविद्यालयात तर जवळ जवळ ९५% विद्यार्थी हे नापास झालेले आहेत

संदेश विधी महाविद्यालय – १४० पैकी १३६ विद्यार्थी नापास, सिद्धार्थ विधी महाविद्यालय – २४० पैकी २०० विद्यार्थी नापास,LLM मध्ये तर मुंबई विद्यापीठातून – ६०० पैकी ५६८ विद्यार्थी नापास , संत. विल्फ्रेड विधी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या ७० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे अजूनही प्रवेश पुष्टीकरण करण्यात आलेले नाही, बऱ्याच महाविद्यालयांनी अजून वर्षभराच्या मार्कलिस्ट सुद्धा विद्यार्थ्यांना वितरीत केलेल्या नाहीत.

विधी शिक्षणाचे गुणवत्ता आणि मानक ही महाविद्यालय पायदळी तुडवत आहेत यावर रोख लावून विधी अभ्यासक्रमाचे होत असलेली वाताहत त्वरित बंद करावी असे आवाहन मसला कडून आज करण्यात आले व अश्या महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीला कुलगुरूंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्रातुन हजारो ग्रामीण भागातील विद्यार्थी हे विधी शिक्षण पूर्ण करून मुंबई सारख्या शहरात येऊन मुंबई उच्च न्यायालयामधे प्रॅक्टिस करून नामवंत वकील होण्याचे स्वप्न उराशी बाळगतात पण मुंबई सारख्या शहरात राहणे परवडत नसल्याने अश्या असंख्य विद्यार्थ्यांना मोठ्या कठीण परिस्थितींना सामोरे जावे लागते अश्या विधी विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष वसतीगृह कालिना कॅम्पस मधे बांधण्यात यावे अशी कळकळीची विनंती वजा मागणी आज कुलगुरूंना मसला कडून करण्यात आली. आमच्या या महत्वाच्या मागणीवर कुलगुरू विद्यार्थी विकास मंडळासोबत चर्चा करुन मार्ग काढून मुंबई विद्यापीठ विद्यार्थी हिताचा निर्णय घेईल असे आश्वासन कुलगुरूंकडून महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिएशनला मिळाले .

विद्यापीठाने आम्हास वेळोवेळी सहकार्य करून आमच्या मागण्या पूर्णत्वास नेल्याबद्दल कुलगुरु आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून धन्यवाद आणि आभार