मल्हार न्यूज चॅनेलच्या बातमीचा दणका

781

मल्हार न्यूज चॅनेलच्या बातमीची प्रशासकीय स्तरावर दखल अखेर जिल्हाधिकारी यांनी दिला राजपूत समाजाला न्याय
महाराणा प्रताप चौकात खाजगी बसेस थांबणार नाहीत -जिल्हाधिकारी

 

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

नंदुरबार मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असलेल्या महाराणा प्रताप चौकात थांबणाऱ्या खाजगी प्रवासी बसेसमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता , याबाबतचे वृत्त आमचे नंदुरबारचे जिल्हा प्रतिनिधी शैलेंद्र चौधरी यांनी मल्हार न्यूज च्या सोशल मीडियावर लाईव्ह केले होते याची नंदुरबारचे जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दखल घेऊन  यापुढे महाराणा प्रताप चौकात थांबणाऱ्या खाजगी बसेस येथे थांबणार नाहीत त्या नगरपालिकेच्या ट्रक टर्मिनल येथे थांबतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बालाजी मंजुळे यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार शहरातील वाहतुक नियंत्रणाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील,प्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव,कार्यकारी अभियंता अनिल पवार, जे.एस.कादरी, शिक्षणाधिकारी माध्यमिक मच्छींद्र कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी दिलीप थोरे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंजुळे म्हणाले की,नंदुरबार शहरातील बसस्थानकाजवळ खाजगी प्रवासी वाहतूक बसेस थांबत असल्यामुळे प्रवाशांना व इतर वाहतूकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो व वाहतूक खोळंबते.या परिसरातील नागरिकांकडून या चौकात थांबणाऱ्या बसेसबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.यापुढे पोलीस विभागाने महाराणा प्रताप चौकात एकही खाजगी बस थांबणार नाही याची दक्षता घ्यावी,तसेच याठिकाणी बस थांबविण्याचा प्रयत्न केला तर त्या खाजगी बस मालकांवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले.
मंजुळे म्हणाले की, अक्कलकुवा धडगांव घाटरोडवर कुठेही कठडे नाहीत,सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याठिकाणी कठडे उभारावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस विभागाने तातडीने कारवाई करावी, त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतुक,वाहनाची स्थिती व अधिकचा भार याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेतला.
जिल्हाधिकारी मंजुळे पुढे म्हणाले की,दुचाकी वाहनाचे अपघाताचे प्रमाण जास्त असते,तरी दुचाकी वाहनधारकांनी स्वत:हुन हेल्मेट वापरला तर अपघाताचे प्रमाण कमी होईल,जनतेने हेल्मेटचा अधिकाधिक वापर करावा यासाठी प्रबोधन करावे असेही त्यांनी सांगितले.