एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशीनला आग; आगीत रोख रक्कम जळून खाक

1406

भूषण गरूड
कोंढवा उंड्री-हडपसर रोडवर, होलेवस्ती कडकनगर याठिकाणी एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशीनला शॉक सर्कीटमुळे आग लागली. आगीमध्ये एटीएम मशीन व एटीएम मशीन मधील 4 लाख रोख रक्कम जळून खाक झाली. आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

कोंढवा बुद्रुक अग्निशामक दलालाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि.29 मार्च रोजी दुपारी 01:15 सुमारास कोंढवा उंड्री-हडपसर रोडवर, होलेवस्ती कडकनगर याठिकाणी एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशीनला शॉक सर्किटमुळे आग लागली. कोंढवा बुद्रुक अग्निशामक दलाला आगीची वर्दी मिळताच घटनास्थळी 3 गाड्या व वाहन चालक योगेश जगताप, फायरमन – सोपान कांबळे, अभिजित थळकर, अविनाश लांडे, नगरे, गायके यांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. एटीएम मशीनला पूर्ण आग लागून एटीएम मशीन मधील रोख 4 लाख रुपये जळून खाक झाले. सुदैवाने घटनास्थळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशीन बुथवर सुरक्षा रक्षकाची तैनाती नसल्याने आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या घटनेची कोंढवा पोलीस ठाण्याला माहिती मिळताच कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विवेक पाडवी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेऊन पुढील तपास करत आहेत.